आज तीन कर्मचारी निलंबीत – एकाची प्रकृती बिघडली दवाखान्यत दाखल ; कर्मचारी आक्रमक
करमाळा समाचार
राज्य परिवहन महामंडळाचे कर्मचार्यांनी पुकारलेल्या आंदोलनाला आता वेगळे वळण लागत आहे. नुकतेच करमाळ्यातील तीन कर्मचाऱ्यांचे निलंबन केल्यामुळे इतर कर्मचाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत निलंबन मागे घ्यावे अन्यथा तीव्र स्वरूपाचा लढा उभारू असा इशारा देत सर्वस्वी जबाबदारी ही प्रशासनावर राहील असे निवेदन आगार प्रमुखांना दिले आहे.

करमाळा आगाराच्या वतीने काही दिवसांपूर्वी दोन तर आज तीन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले. या निलंबनाच्या विरोधात आज सर्वच कर्मचारी एकत्र येत आगार व्यवस्थापकांना निवेदन देत इशारे दिले आहेत. दरम्यान तीन पैकी एका कर्मचाऱ्याची प्रकृती बिघडली असून त्यांना करमाळ्यातील खाजगी दवाखान्यात दाखल करावे लागले आहे. त्यामुळे परिवहन कर्मचारी तीव्र भावना व्यक्त करत आहेत.

दिलेल्या निवेदनात कर्मचाऱ्यांनी म्हटले आहे की, मुंबई उच्च न्यायालयाने सदर दुखवटा पाळण्यात परवानगी दिलेल्या आहे. तरीदेखील आपण माणुसकीशून्य असल्यासारखे वागत केवळ सूडबुद्धीने वागत आहात. दुखवट्यात सहभागी कर्मचाऱ्यांचे थोडे थोडे गट करून त्यांच्यावर बेकायदेशीरपणे निलंबना सारख्या कारवाया करून त्यांच्या भावनेला ठेच पोहोचतील अशी वागणूक करत आहात. मानसिक छळ होईल असे वागत आहात.
अशा मानसिक त्रासाला कंटाळून जर आमच्या स्वतःच्या जिवाचे काही बरे वाईट करुन घेतले किंवा कोणताही अनुचित प्रकार घडला याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासन म्हणून आपली राहिल असा इशारा देत सन्मानाने निलंबन मागे घ्यावे व बिनशर्त सहकार्य करावे अशी विनंती यावेळी कर्मचाऱ्यांनी केली. तरी याबाबतच्या प्रत ही मुख्यमंत्र्यांपर्यंत पासून ते सर्व प्रमुख विभागांकडे पाठवण्यात आले आहे.