गाळप हंगाम निम्म्यावर- २६५ जैसे थे ; भावही गुलदस्त्यात
करमाळा समाचार -संजय साखरे
15 ऑक्टोबर च्या दरम्यान चालू झालेला साखर कारखान्यांचा गाळप हंगाम आता जवळपास निम्म्यावर आला आहे. करमाळा तालुक्यातील तिन्ही साखर कारखाने पूर्ण क्षमतेने चालू आहेत. कमला भवानी शुगर ने आज अखेर ३१७३२२ मे. टन, भैरवनाथ शुगर लिमिटेड ने आज अखेर २८८००० मे. टन आणि मकाई सहकारी साखर कारखान्यांने १४७००० मेट्रिक टनाचे गाळप पूर्ण केले आहे. याशिवाय शेजारील विठ्ठल राव शिंदे सहकारी साखर कारखाना माढा, अंबालिका शुगर राशीन, बारामती ऍग्रो शेटफळगडे या साखर कारखान्यांनी मोठ्या प्रमाणावर गाळप केले असून तालुक्यातील ऊस या कारखान्यास मोठ्या प्रमाणावर गाळ गाळपास जात आहे.

सर्व साखर कारखान्यांनी जास्त साखर उतारा देणाऱ्या उसाला प्राधान्य दिले असून 265 जातीचा ऊस अद्यापही शेतात उभा आहे . या उसाला मोठ्या प्रमाणावर तुरे येऊ लागल्याने ऊस आतून पोकळ होऊन वजन घटण्याची भीती शेतकऱ्यांना वाटू लागली आहे. सर्व साखर कारखान्याचे अधिकारी उसाचे टिपरू न टिपरू गाळप केल्याशिवाय कारखाना बंद करणार नाही असे सांगत असले तरी सध्या गाळप हंगाम निम्म्यावर आला असून तालुक्याच्या पश्चिम भागात व पूर्व भागातील सीना बॅकवॉटर पट्ट्यात अद्यापही मोठ्या प्रमाणावर ऊस उभा असल्याचे दिसून येत आहे.
फेब्रुवारीनंतर उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने ऊसतोड मजुरांची ऊस तोडण्याची क्षमता कमी होते. बहुतेक टोळ्यांची उचल त्यादरम्यान फिटत असल्याने बऱ्याच टोळ्या परतीच्या प्रवासाला सुरुवात करतात .आणि मग डोळ्यांची टंचाई निर्माण झाल्याने त्यांचे ऊस तोडी चे भाव वाढतात .शेतकऱ्याने वर्षभर कष्ट करून, पाणी घालून जोपासलेल्या ऊसाच्या वाड्या वर सुद्धा शेतकऱ्यांचा हक्क नसल्याचे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे. ऊस तोड करणाऱ्या टोळीला ऊसाचे वाढे देऊन सुद्धा त्यांना टनाला कमीत कमी पन्नास रुपये शेतकऱ्यांना ऊस तोडी ला द्यावे लागत आहे .याशिवाय ड्रायव्हरला दोन वेळचा डबा आणि एन्ट्री द्यावी लागत आहे.

परिसरातील अंबालिका शुगर व विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना या कारखान्यांनी एफ. आर. पी जाहीर केली असून बाकीचे कारखाने किती भाव देतात हे अद्यापही गुलदस्त्यात आहे. वर्षभर काबाडकष्ट करून खत माती घालून पिकवलेला ऊस कारखान्यास देताना शेतकऱ्यांना ऊस तोड मुकदमा ची हाजीहाजी करावी लागत आहे. एकंदरीत करमाळा तालुक्यातील सद्यस्थितीत उसाची परिस्थिती पाहता शेतकरी मेटाकुटीला आला आहे.