दोनशे वर्षापूर्वी राममंदीर स्थापना ; गुढी ऐवजी मारुती ध्वज उभारण्याची प्रथा
करमाळा समाचार – विशाल घोलप
तालुक्यात सर्वात जुनी पंचधातू पासून बनवलेली व पंचायतन मूर्तीची स्थापना सुमारे २०० वर्षांपूर्वी येथील रामनवमीवाले यांच्याकडे करण्यात आली होती. तेव्हापासून ते आज पर्यंत भक्ती भावाने याची विधीवत पूजा मार्गदर्शन केल्याप्रमाणे सुरू आहे. सध्या याचे काम नाना रामनवमीवाले व चंद्रशेखर रामनवमीवाले हे पाहत आहेत.

किल्ला विभाग येथे साधारण दोनशे वर्षांपूर्वी अंताजी रामनवमी वाले यांनी राम, सीता, लक्ष्मण, भरत व मारुती अशा सर्वांचा समावेश असणारे पंचायतन मूर्तीचे मंदिर स्थापना केली आहे. सदरच्या मंदिरात गावकरी मोठ्या भक्ती भावाने दर्शनासाठी येत असतात. पाडव्या दिवशी या ठिकाणी पंधरा दिवस उत्सव चालतात. पाडव्या दिवशी या ठिकाणी गुढी न उभा करता मारुती ध्वज उभा केला जातो.

तर नवमीला दुपारी साडेबारा वाजता राम जन्म साजरा केला जातो. रात्री रामाला जेवण म्हणून छोट्या मुलांना जेवण घातले जाते. दशमीला राम पाळण्यात घालून नाव ठेवतात. तर एकादशीला रामाचे लग्न लावण्याची प्रथा आहे. द्वादशीला सकाळी पालखी घेऊन राम मारुती भेटीला जातात. तर त्रयोदशीला रामाची वरात पालखी घेऊन गावभर मिरवणूक काढली जाते.
यावेळी देवीचामाळ रस्त्याच्या बाजूने अंताजी रामनवमीवाले यांची समाधी असून त्या ठिकाणीही रामाचं मंदिर बांधण्यात आलं आहे. त्या ठिकाणी मिरवणूक पोहोचते. चतुर्दशी दिवशी रामाचे लळीत म्हणजेच देव झोपवतात. सर्व मार्गदर्शक पद्धतीने प्रथा व रुढी परंपरेनुसार चालत आलेल्या पाळल्या जातात व राम मंदिराची पूजाअर्चा केली जाते. या ठिकाणी शहरातील शेकडो भाविक येऊन दर्शन घेतात.