बाळुमामाच्या नावाने फसवणुक करणाऱ्या महाराजाचे बस्तान कधी उठणार ? ; भक्तांकडुन होतोय निषेध
करमाळा समाचार
करमाळा तालुक्यामध्ये उंदरगाव येथील मनोहर भोसले हे भक्तांची दिशाभूल करीत आहेत. बाळू मामाचे नाव सांगून आपले आर्थिक हितसंबंध जोपासत आहेत अशा आशयाचे पत्र सध्या व्हायरल होत आहे. तर या बाबत आदमापूर च्या ग्रामपंचायतीने ठरावही पास केला आहे. वारसदार कोणच नसताना आपणच वारसदार असल्याचे जाहीर करणाऱ्या महाराजाची करमाळा तालुक्यातील बस्तान अजुन किती दिवस टिकून राहणार असा प्रश्न आता सामान्य व्यक्तींना पडू लागला आहे.

आमवश्याला अकरा हजार रुपयाची प्रत्येकी देणगी घेऊन माहिती देणाऱ्या बाबांवर आता नेमकी कोणती कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. काही दिवसांपूर्वी मोठमोठ्या मंत्र्यांची लाईन या बाबाकडे लागलेली होती. तर परिसरातील ग्रामस्थांनीही त्याच्या विरोधात अनेक तक्रारी केल्या होत्या. परंतु या तक्रारींचे मोठ्या ओळखीखाली दबून गेल्याचे दिसून आले. पण आता सर्व स्तरातून या बाबाचे पितळ उघडे पाडण्याचं सर्वांनीच ठरवलेलं दिसतंय. त्यामुळेच आता सर्वच ठिकाणी उंदरगाव च्या बाबतची चर्चा सुरू झाली आहे.

आदमापुर येथील ग्रामस्थांनी ठराव केल्याप्रमाणे श्री सद्गुरू बाळुमामाच्या नावाने आर्थिक हितसंबंध जोपासणाऱ्या व श्री बाळूमामाचे भक्तांची लूट करणाऱ्या मनोहर भोसले यांचा यावेळी निषेध करण्यात आला. तर बाळूमामा आजही आपल्या मेंढ्या रूपी कळपात अजूनही अस्तित्वात आहेत असा विश्वास आदमापुरचा जनतेला आहे. तर काही अजान अनादिकाळापासून आपणच देव असल्याचे भासवून समाजाला व स्वतःला फसवत आहेत असा उल्लेख पत्रात केला आहे.