यशकल्याणी व पालकांच्या सहकार्याने नगरपरिषद शाळा झाली डिजिटल ; वर्गात टिव्ही आल्याने विद्यार्थी आनंदी
प्रतिनिधी | करमाळा
करमाळा नगरपालिकेच्या नामसाधना प्राथमिक विद्यामंदिर न प सेंट्रल स्कूल मुले नंबर १ या शाळेतील डिजिटल शाळा उद्घाटन, नवनिर्वाचित शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांचा सत्कार व शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांचा सत्कार या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी न प प्राथमिक शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी अनिल बनसोडे होते.

प्रास्तविक मुख्याध्यापिका सुनंदा जाधव यांनी केले. करमाळा शहरातील सेंट्रल स्कूल मुले क्रमांक १ ही संपूर्ण शाळा डिजिटल करण्यात आली. यासाठी यशकल्याणी ग्रामीण सेवाभावी संस्था यांनी ६ स्मार्ट टीव्ही शाळेस भेट दिले. शाळेचे माजी विद्यार्थी डॉ. निलेश मोटे, डॉ. वर्षा करंजकर, शाळेतील उपशिक्षिका वैशाली जगताप यांनी मुलाच्या यशानिमित्ताने, उपशिक्षक लालासाहेब शेरे यांनी त्यांची मुलगी समृद्धी शेरे हिच्या स्मृती प्रित्यर्थ असे प्रत्येकी एक टीव्ही व तसेच शाळेच्या इतर सर्व शिक्षकांनी मिळून चार टीव्ही असे एकूण १४ टीव्ही घेतले. यावेळी भागवत गर्जे यांनी शाळेला ५,००० रु.देणगी दिली. तसेच इतर काही पालकांनी काही प्रमाणात देणग्या दिल्या.
सदर कार्यक्रमाच्या वेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रवीण जाधव, केंद्र समन्वयक दयानंद चौधरी, बार्शी न.पा.चे शिक्षक संजय गोरे, प्रा. नितीन तळपादे, आसिफ जमादार उपस्थित होते. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापिका सुनंदा जाधव, उपशिक्षक सुरेश कोळी, लालासाहेब शेरे, सुनिता शितोळे, सुनिता भैलुमे, धनश्री उपळेकर, सुषमा केवडकर, आशा अभंगराव, वैशाली जगताप, मंगल गलांडे, अर्चना ताटे, सुरेखा कांबळे, अश्विनी ठाकरे इत्यादींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लालासाहेब शेरे व आभार श्रीमती शितोळे यांनी मांडले.
