पुनर्वसित गावठाणातील काम अर्धवटच- ठेकेदाराला तात्काळ सूचना द्या
करमाळा समाचार – संजय साखरे
उजनी बॅक वॉटर परिसरातील पुनर्वसित गावठाण केतुर नंबर 1 येथे महाराष्ट्र शासनाच्या पुनर्वसन विभागाकडून गावांतर्गत एक किलोमीटर रस्ता, एक किलोमीटर बंदिस्त गटारी, नवीन ग्रामपंचायत कार्यालय बांधणे व नवीन स्मशानभूमी शेड साठी 82 लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.

सदर काम मे. पद्मावती कन्स्ट्रक्शन शेटफळगडे तालुका इंदापूर या कंत्राटदाराला देण्यात आले आहे. संबंधित कंत्राटदाराने या कामास सुरुवात केली, मात्र सध्या हे काम अर्ध्यातच त्याने सोडून दिले आहे. उर्वरित काम करण्यासाठी कंत्राटदार कामाकडे येईनासा झाला आहे.

सदर रस्ता केतुर नंबर 1 आणि 2 या गावठाणा ना जोडतो. गेल्या चाळीस ते पंचेचाळीस वर्षापासून उजनी धरण झाल्यापासून या गावांमध्ये पक्का रस्ता नाही. सदर गावांनी उजनी धरण निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणावर त्याग केला आहे. त्यामुळे येथील नागरिकांच्या मूलभूत समस्या खूप आहेत . अजूनही त्या संपूर्ण सुटलेल्या नाहीत. स्मशानभूमी शेड ची अवस्था तर अत्यंत दयनीय झाली असून मरणानंतरही धरणग्रस्तांच्या नशिबी यातनाच आहेत.
त्यामुळे संबंधित कंत्राटदारास हे काम लवकरात लवकर करण्यासाठी आपण तात्काळ सूचना द्याव्यात, अशा आशयाचे निवेदन करमाळा तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष श्री लक्ष्मीकांत पाटील यांनी आमदार संजय मामा शिंदे यांना दिले आहे.