खंडित वीज प्रश्नी शेतकऱ्यांचा ठिय्या ; बॅंका बंद व कारखान्याची थकीत बिले असल्याने अडचणीत भर
करमाळा समाचार – संजय साखरे
गेल्या चार दिवसापासून पारेवाडी वीज उपकेंद्र येथून शेतीसाठी होणारा वीज पुरवठा पूर्णपणे बंद असून यामुळे उजनी बॅकवॉटर परिसरातील शेतकरी हवालदिल झाला आहे. पारेवाडी वीज केंद्रावर करमाळा तालुक्यातील पश्चिम भागातील सर्वच गावांचे कार्यक्षेत्र अवलंबून आहे. या परिसरातील उसाची तोड जवळ जवळ संपत आली असून आता खोडवा उसाला पाण्याची अत्यंत गरज आहे. पण गेल्या तीन दिवसापासून विज बिल वसुलीच्या नावाखाली येथील अधिकाऱ्यांनी या परिसरातील शेती पंपाचा वीज पुरवठा पूर्णपणे बंद केला आहे.

अगदी पिण्यासाठी सुद्धा एक तास ही वीजपुरवठा केला जात नाही .यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांचा उद्रेक झाला असून त्यांनी आज पारेवाडी वीज केंद्रावर ठिय्याच मारला. परंतु येथे शेतकऱ्यांची दखल घेण्यास कोणीही संबंधित अधिकारी हजर नव्हते. संतप्त शेतकऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना फोन लावला असता अधिकाऱ्यांचे फोनही स्विच ऑफ येत होते.
शनिवार पासून बुधवार पर्यंत बँकेला सुट्टी असल्यामुळे शेतकऱ्यांना बँकेतून पैसे काढण्यावर ही मर्यादा आल्या आहेत. याशिवाय काही साखर कारखान्याचे उसाचे पेमेंट अद्याप येणे बाकी आहे परिणामी शेतकऱ्यांना वीज बिल भरण्यात अडचणी येत आहेत.यामुळे शेतकऱ्यांच्या समस्या आणखीनच भर पडली आहे .अधिकाऱ्यांनीअगोदर वीजपुरवठा सुरळीत केल्यानंतरच आम्ही विज बिल भरण्यास तयार आहोत असे येथील शेतकऱ्यांनी सांगितले आहे.

दरम्यान येथील शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांचे नेते श्री अतुल खूपसे पाटील यांच्याशी फोनवरून संपर्क साधला असता त्यांनी उद्या सोमवार दि १५ रोजी सकाळी ठीक दहा वाजता पारेवाडी येथे शेतकऱ्यांच्या वीज समस्या संदर्भात चर्चा करण्यासाठी येणार असल्याचे सांगितले आहे.
शनिवार पासून बुधवार पर्यंत बँकेला सुट्टी असून यामुळे शेतकऱ्यांना पैसे काढता येत नाहीत. अधिकाऱ्यांनी अगोदर वीजपुरवठा सुरळीत करून वीज बिल वसुली करावी.आम्ही सर्व शेतकरी वीज बिल भरण्यास तयार आहोत.
रविंद रामहरी नवले
शेतकरी, पारे वाडी