करमाळासोलापूर जिल्हा

स्त्री अस्तित्वाचा जागर – करमाळा तालुक्यात मासीक पाळीवर प्रबोधन सत्र व प-पाळीचा पुस्तिकेचे वाटप

करमाळा समाचार 

करमाळा तालुक्यातील भगतवाडी या गावात महिला दिनानिमित्त ७ मार्च रोजी ‘प-पाळीचा: जागर स्त्री अस्तित्वाचा’ हे प्रबोधन सत्र आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाला गावातील बऱ्याच महिला आल्याने ग्रामपंचायत कार्यालयात जागा पुरणार नाही असे लक्षात येताच शेजारील दत्त मंदिरात कार्यक्रम घेण्याचे ठरले. सुरुवातीला काही महिलांनी दत्त मंदिरात बसण्यास विरोध दर्शविला पण नंतर गावातील इतर महिलांनीच त्यांना तयार करून दत्त मंदिरात कार्यक्रम घेण्यासाठी सूत्र हलवली ही बाब दखलपात्र आहे.

सत्राच्या सुरुवातीला मी कोणकोणते मुद्दे मांडणार आहे ते सांगत असताना शेवटी पाळीतील अंधश्रद्धेवर ही बोलणार आहे असे मी सांगताच बऱ्याच महिला हिरीरीने बोलू लागल्या आणि आधी अंधश्रद्धावर बोला त्याची गावात जास्त गरज आहे असं सांगू लागल्या. हा माझ्यासाठी दुसरा सुखद धक्का होता. शास्त्रीय माहिती सांगून शेवटी शास्त्रीय दृष्टिकोन तयार करण्यासाठी जेव्हा अंधश्रद्धा विरुद्ध विज्ञान यावर मी बोलू लागलो तेव्हा बऱ्याच महिला त्यावर सहमती दर्शवत होत्या. काही महिला त्याला विरोध ही करत होत्या. पण त्यांचे मुद्दे ही महिलांनी व मी मिळून शांतपणे खोडून काढले.

पाळी ही नैसर्गिक बाब आहे हे सगळ्याच महिलांना माहीत नसतं असं नाही पण बहुतांश महिलांना ते घरातील इतर महिलांना पटवून देणं आणि चालत आलेली प्रथा मोडणं अशक्य वाटत असतं म्हणून त्या हे सगळं निमूटपणे पाळत असतात. त्यामुळेच समाजबंधचा कार्यक्रम ही त्यांना मोठी संधी वाटते आणि त्या आपली मनं, आपली मतं बिनधास्त मांडतात आणि बदलाच्या आशेने बंडाचं पहिलं सार्वजनिक पाऊल टाकतात. एक दिवस हे बंड यशस्वी होईल यावर समाजबंधचा प्रचंड विश्वास आहे.

शेवटी आम्ही या अंधश्रद्धा, पाळीचा विटाळ असलं काही यापुढे पाळणार नाही असं आश्वासन महिलांनी स्वयंस्फूर्तीने दिल्यानंतर कार्यक्रम संपला. कार्यक्रमात महिलांना शर्वरी लिखित प-पाळीचा: किशोरी आरोग्य पुस्तिकेचे वाटप ही करण्यात आले जेणेकरून ही सर्व माहिती त्यांच्याकडे लिखित स्वरूपात ही राहील. लवकरच गावातील काही मुली या कामात समाजबंध सोबत जोडल्या जातील अशी अपेक्षा आहे.
बचत गटांचं जोरदार जाळे गावात आहे याचा महिलांना व्यक्त होण्यासाठी, स्वाभिमानाने जगण्यासाठी, कलागुण विकसित करण्यासाठी तसंच चूल आणि मूल यातून बाहेर पडण्यासाठी फायदा होत आहे. मित्रवर्य ऍड नामदेव पाटील – बहीण मिराबाई, इंजिनिअर सोमनाथ फासे – मनिषा वहिनी यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचे नेटके आयोजन करण्यात आले.

गाव पातळीवर ही हे बदल शक्य आहेत फक्त गावातील शिकलेल्या लोकांनी जाणीव ठेवून त्यासाठी सातत्याने प्रयत्न करणं, त्यासाठी पूरक वातावरण तयार करणं हे जाणीवपूर्वक केलं पाहिजे हे या सगळ्यातून दिसतं. आयुष्यातला आणखी एक दिवस सार्थकी लागला याचं समाधान आहे.
– सचिन आशा सुभाष

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE