video – टेंभुर्णी महामार्गावर कविटगाव जवळ खड्ड्यामुळे पडला पोकलॅन्ड ; सुदैवाने जीवीतहानी नाही
करमाळा समाचार
करमाळा जातेगाव व करमाळा टेंभुर्णी या मार्गावर सध्या मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले असून रस्त्यावरून वाहतूक करणे हे जीवघेणे ठरत आहे. काही दिवसांपूर्वी टेम्भूर्णी च्या दिशेने जाणारा एक कंटेनर पलटी होऊन त्यातील पोकलॅण्ड पलटी होऊन पडले होते. सुदैवाने त्या शेजारी कोणतेही वाहन नसल्याने मोठा अपघात झाला नाही. पण असा पद्धतीचा अपघात झाल्यास जबाबदार कोण असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे.


मागील अनेक वर्षांपासून ठेकेदार व प्रशासनाच्या वादात हा रस्ता अडकून पडला आहे. संबंधित ठेकेदार हा त्याच्या हक्कासाठी न्यायालयात गेल्याचे कळते आहे. तर प्रशासन त्यांच्या विरोधात आपली बाजू न्यायालयात जाऊन मांडत आहे. पण रस्त्याची डागडुजी व त्यावर होणारे अपघात यावर कोणाचा आणि कसा ताबा आहे हे अजून सामान्य लोकांना समजून आले नाही.
*अहमदनगर टेंभुर्णी महामार्गाची सध्या अशी अवस्था झाली आहे कि, त्या रस्त्यावर खड्डा पडला आहे म्हणणे म्हणजे दिशाभूल ठरत आहे !!* करमाळा टेंभुर्णी मार्गाची झालेली दुरावस्था कशा पद्धतीने झाली आहे. त्याला खड्डा म्हणाल की आणखी काही ?
करमाळा ते अहमदनगर जवळपास 90 किमी अंतर व करमाळा ते टेंभुर्णी जवळपास 45 किमी अंतर आहे या दरम्यान ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून दोन तासांच्या प्रवासामध्ये जवळपास चार तास खर्ची होत आहेत. प्रवासातील वेळेचा प्रश्न एक वेळी बाजूला ठेवू शकतो. परंतु याठिकाणी रात्री-अपरात्री ची वाहतूक होत असते दरम्यानच्या काळात खड्ड्यांच्या अडचणींमुळे छोट्या गाड्या ह्या हळू जात असतात. त्यामध्ये विविध ठिकाणांहून येणाऱ्या प्रवाशांमध्ये कुटुंबे असतात विविध कार्यक्रमांमधून येणाऱ्या या कुटुंबांकडे सोने-नाणे व पैसाअडका ही असतो. रात्रीचा प्रवास ह्या मार्गावरून करत असताना गाडी हळू घ्यावी लागते. त्यामुळे त्या ठिकाणी त्यांची लुटमार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशावेळी ही चूक कोणाची असा प्रश्न उपस्थित होत आहे.
रस्ताच्या दुरावस्थेला बांधकाम विभाग व संबंधित ठेकेदार जबाबदार आहे. यापूर्वी व येणाऱ्या काळात या ठिकाणी मोठमोठे अपघात झाले आहेत. सध्या रस्ता हा यमदूत झाला असून यावरून कधी केव्हा कोणता अपघात घडेल हे सांगणे कठीण झाले आहे. एक तर रस्त्याची डागडुजी होणे गरजेचे आहे किंवा या रस्त्यावरून प्रवास बंद करण्याची वेळ आली आहे. अशा परिस्थितीत कोणता अपघात झाल्यास संबंधित अपघातास प्रशासन व ठेकेदारास जबाबदार धरून जो कोणी जबाबदार असेल त्यावर गुन्हे दाखल होणे अपेक्षित आहे. रस्त्याच्या डागडुजीच्या मागणीसाठी आमचे प्रयत्न सुरू असून येणाऱ्या 18 तारखेला आम्ही यासंदर्भात आंदोलनही करणार आहोत.
– संदिप तळेकर, तालुकाध्यक्ष, प्रहार, करमाळा