हजारो वर्हाडींच्या साक्षीने रंगला रामसीतापाणिग्रहण सोहळा
करमाळा समाचार
हिंगणी येथे भावार्थरामायण चालू असून यातील अध्याय क्रमांक २५ मधील रामसीता विवाह या कथेचे वाचन व निरुपण सोहळा आयोजित करण्यात आला होता.

हा सोहळा खूपच राममय,भक्तिमय वातावरणात थाटामाटात पार पडला.या सोहळ्यासाठी पंचक्रोशीतील हजारो श्रोते,वाचक व सूचक उपस्थित होते.

दुपारी संपूर्ण गावातून सनईच्या सुरात,भजन व रामपदांचे गायन करीत रामफेरी काढण्यात आली. संध्याकाळी सात ते साडेआठ वाचन व निरुपण करण्यात आले. पुरुष मंडळीनी मंगलाष्टके व मातामाऊलींनी उत्स्फूर्तपणे उखाणे गायन करुन रामप्रभूंच्या विवाह सोहळ्यात आपली सेवा सादर केली.
त्यानंतर महाप्रसादाचे सेवन करण्यात आले.हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी हिंगणी गावातील संपूर्ण तरुण कार्यकर्त्यांनी सिंहाचा वाटा उचलला. या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन तनमनधन खर्च करुन श्री विष्णू मारुती जाधव व श्री किसन गजेंद्र बाबर यांनी केले होते.
महाप्रसाद,मंडप,रोषणाई,साऊंडसिस्टीम इ. सर्व नियोजन या दोन कुटुंबियांनी उत्कृष्टपणे पार पाडल्याबद्दल सरपंच हनुमंत पाटील यांनी श्रीफळ देऊन सत्कार केला.
या कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढविल्याबद्दल सर्वांचे अंतकरणपूर्वक आभार.