“दारू पी नाहीतर बिल दे” असे म्हणून सिमेंट ब्लाॅक डोक्यात मारून मित्राला केले जखमी
करमाळा: तालुका प्रतिनिधी
कविटगाव तालुका करमाळा येथील येसोबा देवाची यात्रा करून परत येत असताना जेऊर येथील साई हाॅटेल मध्ये “दारू तरी पि नाहीतर दारूचे बिल तरी दे”, असे म्हणून नकार देणा-या मित्राला खाली पाडून सिमेंट चा ब्लाॅक डोक्यात मारून गंभीर जखमी केल्याचा गुन्हा करमाळा पोलिसांत दाखल करण्यात आला आहे. याची फिर्याद दादा वय 21 रा. निंभोरे तालुका करमाळा याने करमाळा पोलिसांत दिली आहे. हा प्रकार जेऊर टेभूर्णी रस्त्यावर साई हाॅटेल समोर गुरूवारी (ता.24) रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घडला आहे. भैया रा.निभोरे तालुका करमाळा असे संशयित आरोपींचे नाव आहे.

याबाबतची हकीकत अशी की, फिर्यादी दादा हा निंभोरे येथे असताना गुरुवारी दुपारच्या सुमारास त्यांच्या भावकीतील मित्र भैया याने फोन केला की कविटगाव येथे येसोबा देवाची यात्रा आहे त्या यात्रेसाठी साडेचार वाजता मोटरसायकलवर जायचे आहे. त्या अनुषंगाने दोघेही गुरुवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास कविटगाव येथे यात्रेत सहभागी झाले. त्यानंतर संपूर्ण यात्रेत देवदर्शन करून आनंद घेतल्यानंतर रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास संशयित आरोपी भैया यांच्या बहिणीचे इथे जेवण केले. त्यानंतर ते निंभोरे या गावाकडे मोटरसायकलवर परत निघाले. प्रवासा दरम्यान संशयित आरोपी भैया यांनी “आज थोडी थंडी आहे. आपण दारू पिऊ”, असे फिर्यादी दादा याला सांगितले.
त्याप्रमाणे जेऊर येथील साई हॉटेलमध्ये जाऊन संशयित आरोपी भैया याने भरपूर दारू प्राशन केली. यावेळी फिर्यादी दादा याला त्याने सांगितले की ,”तू दारू तरी पी नाहीतर बिल तरी दे”, मात्र यावेळी दादा यांने नकार दिला. त्याला सांगितले की माझ्याकडे पैसे नाहीत. त्यामुळे मी दारू पिणार नाही. अन पैसेही देणार नाही.त्यामुळे यावेळी भैया यांने रागाने दादा याची कॉलर पकडून हॉटेलच्या बाहेर ढकलत नेले व खाली पाडले. त्यानंतर छातीवर बसून हाताने ठोसे मारले. याचवेळी जवळच पडलेल्या सिमेंट ब्लॉक ने डोक्यात मारून गंभीर जखमी केले.

यावेळी झालेल्या आरडाओरडीने साई हॉटेलचे मॅनेजर व वेटर याने भांडणे सोडवा सोडवी केली. त्यानंतर दादा याला सोडून मोटरसायकलवर भैया हा निघून गेला. अशी फिर्याद दादा यांनी पोलिसात दिली आहे. याबाबत पोलिसांनी भैया याच्या विरोधात भादवी कलम 323, 324, 504,506 अन्वये गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक प्रवीण धर्मा साने व प्रमोद गवळी हे पुढील तपास करीत आहेत.