चव्हाण खुन प्रकरणातील दोघांना पुन्हा चार दिवसांची पोलिस कोठडी
करमाळा समाचार
नाशीक येथील चव्हाण हत्या प्रकरणातील अटकेत असलेल्या दोन संशयित आरोपींना करमाळा न्यायालयाने आणखीन चार दिवसांची पोलीस कोठडी वाढवली आहे. आई सोबत असलेल्या अनैतिक संबंधाच्या संशयातून खून केल्याचा दोघांवर आरोप आहे. मागील वेळी चार तर आज पुन्हा चार दिवसांची पोलीस कोठडी त्यांना देण्यात आली आहे. यावेळी न्यायाधीश म्हणून बी.ए. भोसले यांनी काम पाहिले. सदर घटनेचा तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक मिठु जगदाळे हे करीत आहेत.

नाशिक येथील कारचालक श्रावण चव्हाण याचा खून करून मृत शरीर करमाळा तालुक्यातील मांगी रस्त्यावर असलेल्या आयटीआय केंद्राजवळ कार मध्ये अर्धवट जळालेल्या अवस्थेत मिळून आले होते. यावरून करमाळा पोलिसांनी शोध लावला असता काही नावे समोर आली. त्यामध्ये सुनील घाडगे व राहुल घाडगे या भावंडांना करमाळा पोलिसांनी ताब्यात घेतले.

तरी एक महिला संशयित आरोपी अद्यापही फरार आहे. दोघांना अटक करून त्यांना न्यायालयात हजर केले. त्यावेळी चार दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली होती. तर आता पुन्हा चार दिवस वाढवली आहे. सरकारी वकील म्हणून सचिन लुणावत यांनी काम पाहिले.