करमाळ्यात राजकीय खलबते – गेम चेंजर सक्रिय ; आबा, दादा, भाऊंची बराच वेळ गुफ्तगु
करमाळा समाचार
करमाळा विधानसभा मतदारसंघात नुकतीच ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार यांची सभा पार पडली. त्यानंतर सायंकाळी करमाळा येथील सावंत परिवाराच्या विवाह कार्यक्रमाच्या निमित्ताने आमदार रणजितसिंह मोहिते पाटील हे आले होते. यावेळी माजी आमदार जयवंतराव जगताप व महाविकास आघाडीचे उमेदवार नारायण पाटील यांच्यात बराच वेळ चर्चा सुरू होती. नेमकी चर्चा समजली नसली तरी मोहिते पाटील हे विधानसभा निवडणुकीच्या बाबतीत गंभीर आहेत हे दिसुन आले. सकाळी जेष्ठ नेते विजयदादा व खासदार धैर्यशील मोहिते तर सायंकाळी रणजीतदादा करमाळ्यात आल्याने काहीच न बोलता बरच काही सांगु जात आहे.
सोलापूर जिल्ह्यात मोहिते पाटील एक मोठा गट असून लोकसभा निवडणुकीमध्ये मोदी लाटेतही मोहिते फॅक्टर व मोहिते लाट कायम राहिलेली दिसून आली होती. महाराष्ट्रात व जिल्ह्यात मोहिते पाटील नावाचा एक वेगळाच आदर आहे. गाव पातळीवर सामान्य कार्यकर्ता ते मोठ्या कार्यकर्त्यापर्यंत मोहिते पाटलांचे जाळे कायम पसरलेले असते. प्रत्येकाच्या गाठीभेटी घेणं सुख दुःखात सहभागी होणं , अडलेली कामे मार्गी लावणं हे काम कायम चालू असतात. यामुळे कार्यकर्ते त्यांच्यासोबत टिकून राहतात.
करमाळा तालुक्यातील राजकारणावर कायमच मोहिते पाटील गटाचा प्रभाव राहिलेला आहे. या ठिकाणी याची प्रचिती लोकसभा निवडणुकांमध्ये दिसून येते. लोकसभा निवडणुकीत मोदी लाट असताना सुरुवातीला विजयदादा त्यानंतर धैर्यशील मोहिते पाटील यांना मताधिक्य देत करमाळ्याने कायम मोहिते पाटलांची साथ दिली आहे. स्थानिक ग्रामपंचायत ते विधानसभेच्या निवडणुकांपर्यंत मोहिते पाटील स्वतः लक्ष घालण्याचे काम करीत आलेले आहे. त्यामुळे आजही मोहितेंच्या शब्दाला मान आहे.
मागील काही दिवसांपूर्वी रणजितसिंह मोहिते पाटील यांनी तालुक्यात दौरा करीत निकटवर्तीय पण वेगळ्या पक्षात असलेल्या सगळ्याच जुन्या कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतल्या व त्यांना योग्य त्या सूचना दिल्या. त्याप्रमाणे कार्यकर्ते हे मोहिते पाटलांचा मान ठेवतात त्यातील बरेचसे कार्यकर्ते मोहिते यांच्या सांगण्यानंतर कामालाही लागले आहेत. तर नुकतीच करमाळा येथे झालेली ही भेट बरंच काही सांगून जाते. यामुळे तालुक्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडलेला असाव्यात किंवा घडणार असतील याचीच तर चर्चा सुरू नाही ना ? अशी चर्चा सुरू आहे.