आतापर्यंत कौतुक झालं ते खूप झालं ; जे स्वार्थी आहेत त्यांना त्यांची जागा दाखवा – पवार
करमाळा –
आज इथले जे आमदार आहेत, शेजारचे जे आमदार आहेत त्यांना अनेक वर्ष आम्ही लोकांनी मदत केली, लोकांचे प्रश्न सोडवू असा शब्द दिला. प्रामाणिकपणाने संघर्षाबरोबर राहू, असं सांगितलं गेलं. पण आज कुठे गायब झाले? कळत नाही. जो लोकांच्यात जातो, लोकांना शब्द देतो त्या शब्दांची किंमत ठेवली जात नाही त्यांनी मत मागण्याचा अधिकार गमावलेला आहे. त्यांना आम्ही मतांचा जोगवा देणार नाही असे आवाहन राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते शरदचंद्र पवार यांनी करमाळा येथे नारायण पाटील यांच्या प्रचाराच्या निमित्ताने केले.
पुढे बोलताना पवार म्हणाले की , आपण ज्या काळात या जिल्ह्याचा संपर्क मंत्री होतो, त्या वेळचं माझं रेकॉर्ड काढा. जास्तीत जास्त पैसे मग बबनदादा सांगतील किंवा सहकारी सांगतील त्यांना मी दिलं हा महाराष्ट्राच्या रेकॉर्डमधील हिस्सा आहे. कुठलंही काम घेऊन आला तर त्याला माझी मान्यता असायची. त्याचा हेतू हा होता की तुम्हा सर्वांच्या हिताची जपणूक प्रामाणिकपणाने ते करताहेत असा एक समज माझ्यासारख्याचा होता. पण नंतरच्या काळामध्ये लक्षात आलं की हे जे काही करतात ते शेतकऱ्यांसाठी नाही गावच्या लोकांसाठी नाही.
ती कामे करमाळा असेल, माढा असेल तिथल्या जनतेसाठी नाही. त्यांनी जे काही करायचं ते पहिल्यांदा वैयक्तिक हित, स्वतःचा स्वार्थ याशिवाय दुसऱ्या गोष्टीकडे त्यांनी लक्ष दिलं नाही. जो स्वतःच्या स्वार्थाचा विचार करतो त्यांना आपल्याला किंचितही सहकार्य करण्याची आवश्यकता नाही. त्यासाठी आतापर्यंत कौतुक झालं ते खूप झालं
आज विजेचा प्रश्न आहे, पाण्याचे प्रश्न आहेत यातून मार्ग काढावा लागेल. एकत्र बसावं लागेल नारायण आबांना तुम्ही निवडून द्या. उद्याच्या निवडणुकीमध्ये ते आल्यानंतर नारायण आबांना घेतो, धैर्यशील मोहिते यांना घेतो. बाकीचे महाविकास आघाडीचे जे कोणी आमदार निवडून येतील त्यांना बरोबर घेतो. मी स्वतः त्यांच्याबरोबर बसतो, अधिकाऱ्यांना बोलावतो आणि हे प्रश्न कसे सुटत नाहीत? हे आम्ही बघतो. मी तुम्हाला खात्री देतो की, तुमच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याची ताकद आम्हा सगळ्यांमध्ये आहे. तुमची ताकद आणि शक्ती नारायण आबांच्या मागे उभी करा आणि मोठ्या मतांनी त्यांना विजयी करा असे आवाहन पवार यांनी केले.
यावेळी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, माजी आमदार जयवंतराव जगताप, भूषणसिंह होळकर, रवी पाटील, सवितादेवी राजेभोसले, सुवर्णाताई शिवपुरे, संतोष वारे, वैभवराजे जगताप, शंभूराजे जगताप, संजय पाटील, शहाजीराव देशमुख, उस्मानशेठ तांबोळी, सुनील सावंत, नवनाथ झोळ, अतुल पाटील, नलिनीताई जाधव यांच्यासह करमाळा विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार नारायण (आबा) पाटील हे उपस्थित होते.