केंद्र शासनाच्या HAPIS पथकाची करमाळा तालुक्यात अतिवृष्टीग्रस्त पिकांची पाहणी
करमाळा समाचार
करमाळा तालुक्यातील अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्र शासनाच्या HAPIS (Horticulture Area Production Information System) या संस्थेच्या अधिकाऱ्यांचे पथक करमाळा तालुक्यात भेट दिली. या पथकात डॉ. नवीनकुमार पाटले (ॲडिशनल कमिशनर, कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय, नवी दिल्ली), डॉ. रोहित बिष्ट (डेप्युटी कमिशनर, कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय, नवी दिल्ली) तसेच श्रीयुत हेमंता भार्गव (असिस्टंट डायरेक्टर, कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय, नवी दिल्ली) यांचा समावेश होता.

पथकाने पांडे गावातील कृष्णा गोविंद वीर व मेघा सुभाष मोहोळकर यांच्या कांदा पिकाची तसेच वैशाली अमोल राऊत यांच्या तुर पिकाची नुकसानीची पाहणी केली. याशिवाय फिसरे गावातील शेतकरी नागेश काटे व इतर शेतकऱ्यांशीही पथकाने प्रत्यक्ष संवाद साधला व शेतकऱ्यांच्या समस्या, उत्पादन खर्च, लागवड खर्च व झालेले नुकसान याविषयी सविस्तर चर्चा केली. तालुका कृषी अधिकारी श्री. राजेंद्र नेटके यांनी शेतकऱ्यांचे झालेले नुकसान पथकाच्या निदर्शनास आणून दिले, तर उपविभागीय कृषी अधिकारी संजय वाकडे यांनी कांदा, ऊस व इतर पिकांच्या नुकसानीची माहिती दिली.
या वेळी कृषी विभागामार्फत उपविभागीय कृषी अधिकारी संजय वाकडे, तालुका कृषी अधिकारी राजेंद्र नेटके, मंडल कृषी अधिकारी अमर अडसूळ, उप कृषी अधिकारी प्रवीण दगडे, सहाय्यक कृषी अधिकारी टी. एल. चव्हाण, सहाय्यक कृषी अधिकारी अतुल शहा व सहाय्यक कृषी अधिकारी गणेश माने उपस्थित होते.

शेतकरी बांधवांशी संवाद…
पथकातील अधिकाऱ्यांनी शेतकरी बांधवांशी प्रत्यक्ष हितगुज साधले. “शेतकऱ्यांचे खरंच मोठे नुकसान झालेले आहे. असे त्यांनी मत व्यक्त केले. त्याचबरोबर, “शेतकऱ्यांना सकारात्मक पद्धतीने जास्तीत जास्त मदत कशी करता येईल यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू आणि या सर्व माहितीचा अहवाल केंद्र शासनाकडे पाठविला जाईल” असेही पथकाने स्पष्ट केले.
