करमाळासोलापूर जिल्हा

अतिवृष्टीमुळे बाधित फळबागांचे पंचनामे 31 ऑक्टोबर पर्यंत करा ; अन्यथा 1 नोव्हेंबर रोजी रास्ता रोको आंदोलन

प्रतिनिधी अमोल जांभळे –


करमाळा तालुक्यात ऑक्टोबर महिन्यात सरासरीपेक्षा दुप्पट पाऊस झालेला आहे. 900 मिलिमीटर पेक्षा अधिक पावसाची नोंद शासन दरबारी नोंदलेली आहे.सध्या कृषी विभागाकडून अतिवृष्टीने बाधित झालेल्या पिकांचे पंचनामे सुरू आहेत. परंतु दृश्य स्वरूपात फळबागामधील नुकसान 33 टक्के पेक्षा अधिक दिसत नसल्यामुळे केळी ,आंबा, डाळिंब, निंबोणी, सिताफळ आदी फळबागांचे पंचनामे केले जात नाहीत.

प्रत्यक्षात बाधित फळबागांचे नुकसान 50 टक्के पेक्षा अधिक आहे. यापूर्वीच कंपनीने तालुका कृषी अधिकारी ,तहसीलदार, जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन केळी उत्पादक शेतकऱ्यांसह फळबाग उत्पादकांची व्यथा निवेदनाद्वारे कळविली होती. तरीही त्याची दखल अद्याप पर्यंत शासनाने घेतली नसल्यामुळे सर्व बाधित फळबागांचे पंचनामे 31 ऑक्टोबर 2022 पर्यंत करा अन्यथा 1 नोव्हेंबर 2022 रोजी करमाळा – टेंभुर्णी रस्त्यावर कुंभेज फाटा याठिकाणी रास्ता रोको आंदोलन केले जाईल असा इशारा कंपनीच्या वतीने आज देण्यात आलेला आहे. या निवेदनाच्या प्रती तहसीलदार, पोलीस निरीक्षक व तालुका कृषी अधिकारी यांना देण्यात आल्या आहेत.

या निवेदनामध्ये म्हटले आहे की, ऑक्टोबर महिन्यात करमाळा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झालेली आहे. या अतिवृष्टीने बाधित असलेल्या पिकांचे सध्या पंचनामे सुरू आहे. परंतु या पंचनाम्यामध्ये केळी, आंबा,लिंबू,डाळिंब या फळबागांचे पंचनामे केले जात नसल्याचे निदर्शनास आलेले आहे.

सध्या फळबागांमध्ये केळी या फळबागेची लागवड करमाळा तालुक्यात खूप मोठ्या प्रमाणावरती झालेली आहे. तालुक्यातील सर्व केळी बागांना पाणी लागल्यामुळे सर्रास केळी पिकांची मुळकुज झालेली आहे .त्यामुळे बागेमध्ये करपा, शिगा टोका, तांबोरा, गडावरील पिटिंग रोग व बुरशीजन्य रोग इत्यादींचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव वाढलेला आहे. अति पावसामुळे तालुक्यातील केळीचे उत्पादन घटणार आहे तसेच वेगवेगळ्या फवारणीमुळे उत्पादन खर्चामध्ये वाढ होणार आहे. मालाची गुणवत्ता घसरल्यामुळे दरही कमी मिळणार आहे त्यामुळे निर्यातक्षम केळी आत्ता कवडीमोल दराने द्यावी लागणार आहे .

केळी फळबागांप्रमाणेच इतर फळबागांचेही याच पद्धतीने मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे . तरी तालुक्यातील सर्व फळबागांचे पंचनामे सरसकट करून फळबाग उत्पादक शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने न्याय द्यावा असे निवेदन दिलेले आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE