करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

“छत्रपतींच्या राज्यात शिवभक्तांना चोरून पुतळे उभारावे लागत आहेत?” ; प्रशासनाच्या भुमिकेकडे लक्ष

छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेत राजकारण केले जाते; मात्र प्रत्यक्षात शिवभक्तांना महाराजांचा पुतळा उभारण्यासाठी परवानगी मिळत नसल्याने काही ठिकाणी रातोरात पुतळे उभारण्याच्या घटना घडत असल्याची चर्चा सुरू आहे. नियम व परवानग्यांच्या प्रक्रियेमुळे शिवभक्तांना अडचणी येत असल्याचा आरोप काही नागरिकांकडून केला जात आहे.

दरम्यान, पुनवर येथे खाजगी जागेत रातोरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आल्याच्या घटनेमुळे परिसरात चर्चा सुरू झाली असून अशा प्रकारच्या उभारणीवर प्रशासनाकडून कोणती कारवाई होऊ शकते, याबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. सार्वजनिक ठिकाणी किंवा खाजगी जागेत कोणत्याही महापुरुषांचा पुतळा उभारण्यासाठी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था तसेच जिल्हा प्रशासनाची पूर्वपरवानगी आवश्यक असते. परवानगी न घेता पुतळा उभारल्यास तो अनधिकृत उभारणी मानला जाऊ शकतो. अशा प्रकरणात प्रशासनाकडून संबंधितांना नोटीस देऊन पुतळा हटविण्याचे आदेश दिले जाऊ शकतात.

तसेच परिस्थितीनुसार पोलिसांकडून सरकारी आदेशाचे उल्लंघन किंवा सार्वजनिक शांतता भंग होण्याची शक्यता यासारख्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्याचीही तरतूद आहे. याशिवाय पुतळ्यासाठी चबुतरा किंवा इतर बांधकाम केले असल्यास ते अनधिकृत बांधकाम समजून महसूल किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेकडून कारवाई केली जाऊ शकते.

दरम्यान, अशा संवेदनशील विषयांमध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे महत्त्वाचे असल्याने प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. पण सगळा ताण हा कठोर नियमावली मुळे निर्माण झाला आहे. यामुळे स्थानिक प्रशासनावर ताण तर वाढतोच शिवाय महापुरुषांच्या पुतळ्याची विटंबना होण्याचा धोका आहे. त्यामुळे शासनाने ज्या महापुरुषांच्या नावावर राजकारण केले जाते त्या महापुरुषांच्या पुतळ्याबाबत नियमात शिथिलता आणणे गरजेचे आहे. महापुरुषांच्या राज्यात शिवभक्तांना अशा पद्धतीने चोरुन पुतळा उभा करण्याची गरज पडु नये याची काळजी घेतली पाहिजे.

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE