RTE अंतर्गत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्याकडून पुस्तकांचे पैसे घेतल्याची तक्रार
करमाळा :

शिक्षण हक्क कायदा (RTE) अंतर्गत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्याकडून पाठ्यपुस्तकांचे पैसे मागितल्याची तक्रार शिक्षण विभागाकडे करण्यात आली आहे. या संदर्भात करमाळा तालुक्यातील विशाल गुळवे यांनी जिल्हा परिषद सोलापूर येथील शिक्षणाधिकाऱ्यांकडे लेखी अर्ज दिला आहे. तर मुख्याध्यापक यांची पालकांसोबत बोलण्याची पद्धतही योग्य नसल्याची तक्रार शाळेचे काम पाहणाऱ्या डिसोजा यांच्याकडेही केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, करमाळा तालुक्यातील एका खाजगी शाळेत RTE अंतर्गत विद्यार्थ्याला प्रवेश देण्यात आला आहे. मात्र RTE कायद्यानुसार विद्यार्थ्यांना मोफत व सक्तीचे शिक्षण देणे बंधनकारक असताना संबंधित शाळेकडून पाठ्यपुस्तकांसाठी पैसे मागितले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
RTE कायद्यानुसार विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, पाठ्यपुस्तके आदी सुविधा मोफत देणे अपेक्षित असते. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करून संबंधित शाळेवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी अर्जामध्ये करण्यात आली आहे.
दरम्यान, या तक्रारीमुळे शिक्षण विभाग या प्रकरणात काय भूमिका घेतो आणि संबंधित शाळेविरुद्ध कोणती कारवाई होते, याकडे पालक व नागरिकांचे लक्ष लागले आहे.


