करमाळा पुन्हा चर्चेत; ५८ किलो गांजासह चार जणांना अटक – “पुणे पोलिसांची कारवाई, करमाळ्यात शांतता की निष्क्रियता?”
करमाळा (प्रतिनिधी) –

करमाळा तालुक्याचे नाव पुन्हा एकदा गंभीर गुन्हेगारी प्रकरणामुळे समोर आले आहे. पुणे पोलिसांनी ५८ किलो गांजासह चार जणांना अटक केली असून, यामध्ये करमाळा ग्रामीण भागातील युवकांचा सहभाग असल्याची माहिती समोर आली आहे. यात दाहिखिंडी येथील दोघे तर देवीचामाळ व करमाळा शहरातील प्रत्येकी एक असा युवकांचा समावेश आहे.

यापूर्वीही बनावट दारू प्रकरण, तसेच एमडी ड्रग्स विक्रीसंदर्भातील अटक कारवायांमध्ये करमाळ्याचा संबंध समोर आला होता. आता पुन्हा मोठ्या प्रमाणात गांजा जप्तीमुळे तालुक्यातील गुन्हेगारी वाढत असल्याची चर्चा रंगू लागली आहे. सलग उघड होत असलेल्या या घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, “पोलिस यंत्रणा नेमकी काय करतेय?” असा सवाल उपस्थित केला जात आहे. विशेषतः ग्रामीण भागातील युवक गुन्हेगारीकडे वळत असल्याची बाब गंभीर मानली जात आहे.
नागरिकांकडून पोलिस प्रशासनाने कडक कारवाई करत अशा अवैध धंद्यांवर आळा घालावा, तसेच युवकांना योग्य मार्गदर्शन करून गुन्हेगारीपासून दूर ठेवावे, अशी मागणी होत आहे.


