एका प्रकरणात दिलासा मिळेपर्यंत नवा गुन्हा दाखल : भोसले च्या अडचणीत वाढ़
करमाळा समाचार

तालुक्यातील घोटी येथे स्वतःला चमत्कारी उपचार करणारा म्हणून सांगणाऱ्या मनोहर भोसले यांच्यासह चौघांविरोधात करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जादूटोणा प्रतिबंधक कायदा तसेच भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये ही कारवाई करण्यात आली आहे. जुन्या गुन्ह्यात आजच दिलासा मिळत न्यायालयीन कोठडीत रवानागी झाली पण आता नवा गुन्हा दाखल झाल्याने उद्या पुन्हा हजर केले जाणार आहे.

घोटी येथील एकाने यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांना मुतखड्याचा त्रास होत असल्याने त्यांनी सुरुवातीला सोलापूर येथे उपचार घेतले होते. मात्र त्रास कमी न झाल्याने गावातील चर्चेनुसार ते 20 जानेवारी 2026 रोजी मनोहर भोसले यांच्या मठात गेले. तेथे सेवेकऱ्यांनी भेटीसाठी 11 हजार रुपये घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर मनोहर मामांनी लाल रंगाची पावडर देत आजार पूर्णपणे बरा करण्याचे आश्वासन दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, काही दिवस आराम वाटल्यानंतर पुन्हा त्रास सुरू झाला. त्यानंतर मनोहर मामांनी आणखी उपचारासाठी 80 हजार रुपयांची मागणी केली. आर्थिक परिस्थितीमुळे फिर्यादीने 30 हजार रुपये दिल्याचे सांगितले आहे. मात्र त्यानंतरही त्रास वाढत गेल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

दरम्यान, पैसे परत मागण्यासाठी मठात गेल्यानंतर “मी कोणाचे पैसे परत देत नाही, काय करायचे ते करा,” असे उत्तर मिळाल्याचा आरोपही करण्यात आला आहे. तसेच 6 मे रोजी दोन व्यक्तींनी फिर्यादीकडे जाऊन पोलिसांत तक्रार देऊ नका, पैसे परत देतो असे सांगत दमदाटी केल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी मनोहर भोसले, मठातील दोन सेवेकरी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

