करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

भोंदू बाबा मनोहर भोसलेला मोबाईल पुरवठा करणारा पोलीस कर्मचारी निलंबित !

करमाळा समाचार

जादूटोणा व फसवणूक प्रकरणात अटकेत असलेल्या भोंदू बाबा मनोहर भोसले आणि साथीदाराला मोबाईल फोन वापरा दिल्या प्रकरणी कुर्डूवाडीचे पोलीस नाईक निलंबित झाले आहेत. याबाबतची कारवाई पोलीस अधीक्षक श्री कुलकर्णी यांच्या आदेशाने करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. पोलीस नाईक दाढे असे त्यांचे नाव आहे. सध्या मनोहर भोसले हे करमाळा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातअटकेत आहेत.

रिअल इस्टेट एजंटला व्यवसायात प्रगतीचे आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी मनोहर भोसले आणि विशाल वाघमारे यांना कुर्डुवाडी पोलिसांनी पुणे येथील मांजरी भागातून अत्यंत गोपनीयरीत्या ताब्यात घेतले होते. तपासाचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पातळीवरून कमालीची गोपनीयता पाळण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. या दोघांना कुर्डुवाडी पोलीस ठाण्यातील गोपनीय कक्षात ठेवण्यात आले होते.

आरोपींना गोपनीय कक्षात ठेवलेले असताना तिथे हजर असलेल्या पोलीस नाईक दाढे यांनी आरोपी विशाल वाघमारे याला मोबाईल देऊन त्याचे कोणाशी तरी संभाषण करून दिले. या कृत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. तपासाच्या कडक सूचना असतानाही आरोपीला अशा प्रकारे मदत करणे आणि आदेशाचा अवमान करणे, हा ठपका ठेवत पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून दाढे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली असून त्यांची नेमणूक मुख्यालयात करण्यात आली आहे अशी माहिती मिळत आहे.

करमाळा पोलीस ठाण्याबाहेर भक्त का साथीदार…
मनोहर भोसले अटकेत असल्यापासून करमाळा पोलीस ठाण्याबाहेर रात्री उशिरापर्यंत काही कार्यकर्ते फिरताना दिसून येतात. पोलीस ठाण्यात अटकेत असलेल्या आरोपीला भेटण्यासाठी रीतसर परवानगी घ्यावी लागते. पण तरीही सदरचे कार्यकर्ते परिसरात घुटमळत असतात. नेमका त्यांचा हेतू काय आहे? सदरचे कार्यकर्ते भक्त म्हणून त्या ठिकाणी येतात का भोसले यांचे साथीदार आहेत याचाही तपास पोलिसांकडून होणे अपेक्षित आहे.

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE