करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

राजस्थानहून सोलापूरमार्गे अहिल्यानगरात एमडी ड्रग्जची तस्करी; करमाळ्यात वास्तव्यास असलेला तरुण अटकेत

करमाळा समाचार :

अहिल्यानगर मध्ये एमआयडीसी पोलिसांनी मोठी कारवाई करत निंबळक बायपास परिसरातून सुमारे ₹५ लाख ८३ हजार २०० किमतीचे २९.१६ ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) जप्त केले आहे. या प्रकरणी राजस्थानचा मूळ रहिवासी व सध्या करमाळा (जि. सोलापूर) येथे वास्तव्यास असलेल्या एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. आरोपीकडून कार, मोबाईल व अंमली पदार्थांसह एकूण ₹११ लाख ४३ हजार २०० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्याचे दोन साथीदार फरार झाले आहेत.

एमआयडीसी पोलिसांचे पथक गस्तीवर असताना निंबळक बायपास येथील लामखेडे पेट्रोल पंपाजवळ दोन संशयास्पद गाड्या उभ्या असल्याचे आढळले. पोलिसांनी चौकशीसाठी पुढे जाताच एका गाडीतील दोघे जण घटनास्थळावरून पसार झाले. मात्र, विनानंबर स्विफ्ट कारजवळ उभ्या असलेल्या एका तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले.

चौकशीत त्याने आपले नाव रविप्रकाश भेराराम बिश्नोई (वय २९, मूळ रा. राजस्थान, सध्या रा. करमाळा, जि. सोलापूर) असे सांगितले. संशय आल्याने पंचांसमक्ष कारची झडती घेण्यात आली. त्यावेळी मागील सीटवरील प्लास्टिकच्या पिशवीत आणि तीन पुड्यांमध्ये २९.१६ ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) आढळून आले. प्राथमिक चौकशीत आरोपीने हे ड्रग्ज विक्रीसाठी आणल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

फरारांचा शोध सुरू आहे. प्राथमिक तपासात हा एमडी ड्रग्जचा साठा राजस्थानमधून सोलापूरमार्गे अहिल्यानगर येथे आणला जात असल्याची बाब समोर आली असून, या रॅकेटमागील इतर आरोपी आणि पुरवठा साखळीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE