करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

डिकसळ पुलाची उंची उंची वाढली जड वाहतूकीला अभय ; नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर!

दोन ठिकाणी भगदाड पडल्याने यापूर्वी जड वाहतूक बंद; ऊस गळीत हंगामाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या निर्णयाकडे लक्ष

करमाळा समाचार :

उजनी जलाशयावरील डिकसळ पुलाची दुरवस्था झाल्याने आणि पुलावर दोन ठिकाणी भगदाड पडल्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव यापूर्वी या पुलावरील जड वाहतूक बंद करण्यात आली होती. मात्र, आता ऊस गळीत हंगामाच्या पार्श्वभूमीवर पुलावरील बॅरिकेटिंगची उंची वाढवण्यात आल्याचे दिसून येत असल्याने जड वाहतूक पुन्हा सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे पुलाच्या सुरक्षिततेचा आणि वाहनचालकांच्या जीविताचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

उजनी जलाशयातील पाणीसाठा सध्या १०० टक्के भरलेला असल्याचे सांगण्यात येत असून, अशा परिस्थितीत पुलाची सद्यस्थिती आणि त्याची भारवहन क्षमता तपासणे अत्यंत आवश्यक आहे. पुलावर यापूर्वी दोन ठिकाणी भगदाड पडल्याने जड वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले होते. असे असताना बॅरिकेटिंगची उंची वाढवून वाहतुकीसाठी मार्ग मोकळा केला जात असल्याचे चित्र दिसत असल्याने या निर्णयामागील नेमके कारण काय, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

सध्या ऊस गळीत हंगाम जवळ येत असल्याने साखर कारखान्यांकडे ऊस वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर कारखान्यांच्या सोयीसाठी वाहतुकीबाबत निर्णय घेतला जात आहे का, अशी चर्चा सुरू आहे. मात्र, पुलाच्या सुरक्षिततेची तांत्रिक खात्री न करता जड वाहतूक सुरू झाल्यास पुलाचे आणखी नुकसान होण्याबरोबरच वाहनचालक, वाहतूकदार आणि प्रवाशांच्या जीवितालाही धोका निर्माण होऊ शकतो.

प्रशासनाने तातडीने खुलासा करण्याची गरज
पुलाची तांत्रिक तपासणी करण्यात आली आहे का? जड वाहतूक पुन्हा सुरू करण्यास अधिकृत परवानगी देण्यात आली आहे का? बॅरिकेटिंगची उंची कोणी आणि कोणत्या आदेशानुसार वाढवली? तसेच संभाव्य दुर्घटना घडल्यास जबाबदारी कोणाची राहणार, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

संबंधित सार्वजनिक बांधकाम विभाग, जलसंपदा विभाग आणि स्थानिक प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन पुलाची सुरक्षितता तपासावी. तांत्रिक अहवाल सार्वजनिक करावा आणि सुरक्षिततेबाबत खात्री होईपर्यंत जड वाहतुकीबाबत योग्य ती खबरदारी घ्यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

ऊस वाहतुकीच्या सोयीपेक्षा नागरिकांच्या जीविताची सुरक्षितता महत्त्वाची नाही का? दुर्घटना घडल्यानंतर जबाबदारी निश्चित करण्यापेक्षा संभाव्य धोका वेळीच रोखण्यासाठी प्रशासन काय भूमिका घेणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE