बिबट्याने मनुष्याचा बळी घेण्याची वाट वनविभाग बघतय का ? त्या बिबट्याच्याही जीवाची पर्वा वनविभागाला नाही ; गेलेला जीव परत देण्यासाठी काय तरतुद आहे का ?
करमाळा समाचार
करमाळा तालुक्यातील नरभक्षक बिबट्याचा खात्मा केल्यानंतर बिबट्याचे भय अजूनही संपत नाही. परिसरात वारंवार बिबट्याचे दर्शन होत आहे. नुकतच वांगी नं 1 येथे दशरथ देशमुख यांचे केळीत बिबट्या जाताना 200 फूटावरून अमित देशमुख याने सायंकाळी 6:00 वाजता पाहिला. तसेच शिवाजी जगताप व औंकार जगताप याने पण पाहिला आहे.


बिबट्याचा मानवी वस्तीत वावर हा धोकादायकच म्हणावा लागेल. आतापर्यंत लोकांचा व बिबट्याचा समोरासमोर संघर्ष झाला नसल्याने मनुष्यावर हल्ले होत नाही. मागील दोन दिवसापूर्वी त्याने याच परिसरातील कुत्र्यांवर हल्ला करून त्यातील कुत्रा फस्त केला होता. सध्यातरी त्याला भक्ष मिळत असल्याने तो माणसांच्या दिशेने हल्ला करीत नाही. पण किती जरी केलं तरी तो शेवटी जंगली प्राणी आहे. मानवी वस्तीतून ज्यावेळेस त्याला एखादं खाद्य मिळणार नाही तो मनुष्यावर ही हल्ला करू शकतो. त्यामुळे लोकांमध्ये त्याबाबत भीतीचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत रात्री-अपरात्री शेतकर्याला शेतीतील कामे करण्यासाठी जावे लागते अशा वेळी हल्ला झाल्यास याला जबाबदार कोण ? गेलेल्या माणसाचा जीव माघारी मिळवून देण्यासाठी वन विभागाकडे काय तरतूद आहे का ?
त्यामुळे वन विभागाने मनुष्य बळी जाण्यापूर्वीच संबंधित बिबट्यांना ताब्यात घेत योग्य त्या ठिकाणी नेऊन सोडणे गरजेचे आहे. ज्यावेळी लोकांचा उद्रेक होईल त्यावेळी बिबट्याला ही जीवाला धोका आहे. लोकांनी त्याला पळून लावण्याची किंवा मारण्याचे ठरवल्यास बिबट्याचे राहणे अवघड होईल व त्याचा बळीही जाऊ शकतो. वन्यजीव टिकवणे जगणे हे आपले कर्तव्य आहे हे वन विभागाला माहित आहे त्यामुळे बिबट्या ची हि काळजी घेत त्यांनी त्याला व्यवस्थित योग्य त्या ठिकाणी पोहोचणे गरजेचे आहे.
सध्या तरी लोकांनी स्वसंरक्षणासाठी सर्व पर्याय अवलंबले पाहिजेत. वनविभागाच्या भरवशावर न राहता आपापल्या पद्धतीने आपल्या व आपल्या कुटुंबाची जबाबदारी घेतली पाहिजे. वन विभागाला जाग येईल तेव्हा येईल पहिले पक्ष आपण बनवू नये याची काळजीही घेतली पाहिजे. तसेच सध्यातरी बिबट्या मनुष्यावर हल्ले करत नसल्याने तो धोकादायक नाही. त्याला उकसवण्याचा किंवा घाबरवण्याचा, पळून लावण्याचा किंवा जखमी करण्याचा कोणताही प्रयत्न करू नये अन्यथा तो पुन्हा मनुष्य हल्ले करण्यास सुरुवात करू शकतो.