विहाळच्या शाळेला सायन्स वॉल उद्घाटनाप्रसंगी अभियंत्याकडुन मोठी भेट
प्रतिनिधी करमाळाः
थोर भारतीय गणित तज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीचे औचित्य साधून तालुक्यातील विहाळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सायन्स वॉलचे उद्घाटन व अभियंता श्रीकांत येळे (सद्या नॉर्वे) यांनी शाळेस भेट दिलेले दोन संगणक संच व स्मार्ट टी. व्ही. चा प्रदान सोहळा पार पडला.

याप्रसंगी गटविकास अधिकारी मनोज राऊत, यशकल्याणी संस्थेचे अध्यक्ष गणेश करे – पाटील, सरपंच युवराज नाळे, उपसरपंच देविदास गाडे, शिक्षण विस्ताराधिकारी अनिल बदे, आदिनाथ देवकते, केंद्रप्रमुख चंद्रहास चोरमले, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नवनाथ कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

सुरुवातीला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व गणित तज्ञ रामानुजन यांच्या प्रतिमांचे पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर गटविकास अधिकारी राऊत यांच्या संकल्पनेतून उभारलेल्या सायन्स वॉलचे उद्घाटन चौथीची विद्यार्थीनी संस्कृती मारकड हिच्या हस्ते फित कापून करण्यात आले. तर अभियंता येळे यांनी शाळेच्या ई-लर्निंगसाठी दिलेले साहित्य सेवानिवृत्त शिक्षक महादेव येळे व सुमन येळे यांच्या हस्ते शाळेचे मुख्याध्यापक सतीश कांबळे व शिक्षिका वैष्णवी आव्हाड यांच्याकडे सुपुर्द करण्यात आले. त्यानंतर येळे यांचा शाळेच्या वतीने गटविकास अधिकारी राऊत यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचलन मुख्याध्यापक सतीश कांबळे यांनी केले. तर आभार आदिनाथ देवकते यांनी मानले. यावेळी नागेश देवकते, गौतम देवकते, जयराम कांबळे, प्रदीप हाके, मोहन मारकड, काशिनाथ भुजबळ, साहेबराव मारकड, संतोष मारकड, योगेश भुजबळ, कारभारी येळे, पंढरीनाथ गाडे, संजय चोपडे, अहिल्याबाई पांढरे, सतीश देवकते, खंडू अनारसे, भारत देवकते, दत्तात्रय जाधव, नवनाथ मारकड, हौसराव बंडगर, अंकुश कांबळे, गौरी मारकड आदिंसह पालक, ग्रामस्थ उपस्थित होते. सर्व उपस्थितांना शाळेच्या वतीने गुलाबाची रोपटी देवून सन्मानीत करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक सतीश कांबळे, शिक्षिका वैष्णवी आव्हाड, अनुराधा शिंदे, श्रीकांत डमाळे, ग्रामसेविका अनिता डोलारे, अंगणवाडी सेविका सविता करे तसेच शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांना यशकल्याणीच्या वतीने करे – पाटील यांच्या हस्ते खाऊ वाटप करुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
जिज्ञासा वृत्ती वाढीस लागेल
—–
विद्यार्थ्यांची योग्य शैक्षणिक प्रगती होण्यासाठी शाळा सुसज्ज असणे आवश्यक आहे. त्यामुळे शाळांचा विकास होण्यासाठी मदत करणारे ग्रामस्थ कौतुकास पात्र आहेत. शाळेतील सायन्स वॉलमुळे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाबद्दल कुतूहल निर्माण होताना त्यांची जिज्ञासावृत्ती वाढीस लागेल.
– मनोज राऊत, गटविकास अधिकारी
———————————————-
शाळेसाठी आवश्यक मदत करु
—–
शाळेस ग्रामस्थांचे सहकार्य होणे उल्लेखनीय आहे. प्राथमिक स्तरावर विद्यार्थ्यांचा विकास योग्य गतीने झाला पाहिजे. असे स्पष्ट करुन यापुढील काळात शाळेसाठी आवश्यक मदत यशकल्याणीच्या माध्यमातून केली जाईल.
– गणेश करे – पाटील, अध्यक्ष, यशकल्याणी संस्था
———————————————-
कार्यक्रमात ग्रामस्थांकडून मदत
—–
शाळेसाठी आतापर्यंत विविध ग्रामस्थांनी मदत दिली आहे. सदर कार्यक्रमावेळी भैरवनाथ पेट्रोलियमचे मधुकर मारकड व चंद्रकला मारकड यांनी शाळेच्या वाचनालयासाठी मदत करण्याचे जाहीर केले. तर शिक्षक संजय चोपडे यांचा मुलगा शंभुराजे याने वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून दोन हजार शंभर रुपयाची देणगी शाळेसाठी दिली. याशिवाय मोहन मारकड व अंकुश भुजबळ यांनीही शाळेला मदत म्हणून देणगी दिली.
———————————————-