E-Paper

कर्जत जामखेडमधील वयोवृध्द पडत आहेत कोरोनावर भारी ;

कर्जत प्रतिनिधी 

एकीकडे कोरोनाची वाढती आकडेवारी ही अनेकांच्या मनात भितीचे व नकारात्मक वातावरण निर्माण करत असली तरी, कोरोनावर विजय हा मिळवताच येतो हे कोरोनातून ब-या झालेल्या वयोवृध्द व्यक्तींच्या उदाहरणांतून समोर येत आहे. कर्जत व जामखेड तालुक्यातील रुग्णालयांमध्ये उपचार घेऊन १०२, १००, ९८, ७५, ६३ वयाच्या घरातील महिला या ठणठणीत ब-या होऊन आपल्या घरी परतल्या आहेत. स्थानिक आ. रोहित पवार, शासकिय अधिकारी व आरोग्य यंत्रणा हे कर्जत व जामखेडमधील दोन्ही रुग्णालयांमध्ये सर्व सुविधा पुरवण्यास कटिबध्द असून प्रत्येक रुग्ण हा लवकरात लवकर बरा होऊन घरी जावा यासाठी अहोरात्र कार्यरत आहेत.

कोरोनाच्या दुस-या लाटेमुळे संसर्गाचे प्रमाण वाढत असून अनेक नागरिकांमध्ये भिती निर्माण झाली आहे. मात्र या भितीला थारा न देता सकारात्मक विचार ठेवून प्रचंड इच्छाशक्ती बाळगून कोरोनावर नक्कीच मात करता येऊ शकते, हे कर्जत जामखेडमधील कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांनी दाखवून दिले आहे. हे रुग्ण कोणी युवा नसून शंभरी गाठलेल्या वयोवृध्द व्यक्ती आहेत. विशेष बाब म्हणजे या सर्व महिला आहेत.

जामखेड येथील सारोळा गावच्या वयवर्ष १०२ असणा-या चंपाबाई तुकाराम मुळे या आरोळे कोवीड सेंटर येथे पाच दिवस उपचार घेतल्यानंतर सोमवारी ठणठणीत ब-या होऊन आपल्या घरी परतल्या. जामखेडमधीलच विठाबाई रामा भवर या १०० वर्षीय आजींनी देखील आरोळे रुग्णालयात दहा दिवस उपचार घेऊन त्यांनी कोरोनावर य़शस्वीरीत्या मात केली. चौंडी गावच्या ६३ वयाच्या गयाबाई बाबासाहेब खरात यांचा एचआरसीटी १६ होता, ऑक्सीजन पातळी देखील खालावली होती. मात्र जिद्द न हरता चिंतामुक्त राहून डॉक्टरांच्या उपचारांना साथ देत ९ दिवसात गयाबाई यांनी कोरोनावर विजय मिळवला.

कर्जतच्या बहिरोबावाडी इथल्या ९८ वर्षीय काशीबाई यशवंत तोरडमल यांनी केवळ प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर कर्जत उपजिल्हा रुग्णालय येथे आठ ते दहा दिवस उपचार घेऊन बरे होत कोरोनावर मात केली.

कर्जतमधील भांबोरा गावच्या ७५ वर्षीय पुष्पा आजिनाथ बेद्रे यांच्यावर वर्षभरापूर्वीच अँजीओप्लास्टी झाली होती, काही दिवसांपूर्वी शरीरातील रक्ताच्या कमरतेमुळे त्यांना रक्ताची सलाईनही लावण्यात आली होती. दरम्यान काही दिवसांनी पुष्पा बेद्रे यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. मात्र कर्जत उपजिल्हा रुग्णालयात चांगल्या प्रकारे उपचार घेऊन बरे होण्याचा आत्मिवश्वास ठेवलेल्या पुष्पा बेद्रे या पाच दिवसांनी कोरोनामुक्त होऊन आपल्या घरी परतल्या.

रुग्णांनी मानले आ. रोहित पवारांचे आभार..
आ. रोहित पवार हे कर्जतमधील उपजिल्हा रुग्णालय व जामखेड येथील आरोळे कोव्हीड रुग्णालय येथे रुग्णांना कोणत्याही समस्येला सामोरे जावे लागणार नाही, याकडे पूर्णपणे लक्ष ठेवून आहेत. वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन आ. रोहित पवार यांनी कर्जत व जामखेडमध्ये प्रत्येकी १ हजार क्षमतेच्या खाटांचे जम्बो कोव्हीड सेंटर सुरु केले आहे. कोरोनाच्या संकटातून ब-या झालेल्या या सर्व वयोवृध्द व्यक्तींनी आ. रोहित पवार यांच्यासह रूग्णालय प्रशासनाचे आभार मानले.

कर्जत व जामखेडमधील कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन आपल्या घरी परतत आहेत, ही खूप समाधानकारक बाब आहे, मात्र त्याहूनही १०० रीच्या घरातील वयोवृध्द व्यक्ती देखील कोरोनावर विजय मिळवत आहेत, ही बाब आपल्या प्रत्येकासाठी आदर्शवत उदाहरणच म्हणावे लागेल. कोरोनाचा संसर्ग झाला तरी, अजिबात डगमगून न जाता वैद्यकिय उपचारांची साथ व सकारात्मक विचार मनात ठेवत नेटाने सामना केल्यास नक्कीच आपण कोरोनामुक्त होऊ शकतो हे यातून दिसून येते.”
आ. रोहित पवार

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE