करमाळासोलापूर जिल्हा

तुम्ही कितीही बोंबा मारा आम्ही सुधारणार नाही ; घाणप्रिय करमाळा नगरपरिषदेची अवस्था

समाचार टीम

आज भारतात स्वातंत्र्य दिन अमृत महोत्सव आपण साजरा करत असताना प्रत्येक घरावर झेंडा लावण्याचा संकल्प केला आहे. आपण त्याचे जागरूक नागरिक म्हणून पालन करू किंवा नाही करू पण दिन तर साजरा करणारच आहोत. पण नगरपरिषदेसारखे प्रशासन मात्र आपले काम योग्य पद्धतीने करताना दिसून येत नाही. तुम्ही कितीही बोंबा मारा पण आम्ही सुधारणार नाही या पद्धतीप्रमाणे नगर परिषदेचे काम सुरू आहे.

महिनाभरापूर्वी नगरपरिषदेच्या नगरसेवकांचा कार्यकाल पूर्ण झाला व नगरपरिषदेची नियोजन बघण्याचे काम हे प्रांत यांच्याकडे सोपवण्यात आले. पण नगरपालिकेचे सध्याचे काम हे रामभरोसेच असल्याचे दिसून येत आहे. गावात अनेक ठिकाणी कचरा साठलेला तसाच आहे. गटारीतील गाळ काढलेला नाही. बऱ्याच दिवसानंतर तहसील कचेऱी समोरील गटारीचा गाळ हा जेसीबीने काढण्यात आला ही अभिमानाची का शरमेची बाब ही लक्षात येण्यापलीकडचे आहे.

शहरात आज ठीक ठिकाणी कचऱ्याचे ढीग साठलेले आहेत. त्यावर मोकाट जनावरे, डुकरे मनसोक्त ताव मारताना दिसतात. तर यातून हा कचरा सर्वत्र पसरला जात आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत गाळ हा काढून तसाच रस्त्याच्या कडेला टाकलेला जातो. कित्येक दिवस तर गटारीच काढल्या जात नाही. पावसाने तो गाळ रस्त्यावर व घरापर्यंत पोहोचला आहे.

त्यात नगरपरिषदेला काम करण्याची एवढी उर्मी उत्पन्न झाली की सिमेंट रस्त्याची काम नगरपालिकेने हातात घेतले. पण ही काम करत असताना अनेकांना आपण तळघरात राहतो की रस्त्याच्या कडेला हे समजेनासे झाले आहे. एकाच रस्त्यावर दोन तीनदा पुन्हा पुन्हा सिमेंटचे थर वाढवल्याने सदरचा रस्ता उंच आणि घरे खोलात गेले आहेत. त्यामुळे रस्त्यावर येणारे पावसाचे पाणी, गटारीचे पाणी हे गटार वरून वाहत असताना लोकांच्या घरात जाऊ लागले आहे. तरी नगरपरिषदेला याचे काहीच घेणे देणे नाही. “काय तर आपण अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण” करत आहोत.

नेत्यांपेक्षा प्रशासन चांगल्या पद्धतीने कारभार करू शकेल असा अनेकांचा गैरसमज या निमित्ताने दूर झाला असेल. नेत्यांना कायम नाव ठेवणारी शिव्या घालणारे लोक आता मूक गिळून गप्प आहेत. प्रशासनाला कोण बोलणार असा त्यांना प्रश्न आहे. आजच्या अडचणी ज्या चुका होत आहेत यावर बोलायला कोण तयार नाही. पण त्रास तर सर्वांनाच होतोय. फक्त सोशल माध्यमातून ते व्यक्त होत आहेत. पण तक्रार कोण जाऊन करत नाही. प्रशासनाकडून झालेल्या चुका या निमित्ताने समोर आणण्याचा हा प्रयत्न आहे. खरंच आपण अमृत महोत्सवी वर्ष साजरा करण्यात इतपत योग्य झालो आहोत का? हे प्रशासनाने ही एकदा तपासावे लागणार आहे.

सदरच्या बातमीत आज एक फोटो आपण वापरत आहोत. तो फोटो छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या नजीकचा आहे. एका दवाखान्याशेजारी परिसर किती स्वच्छ असला पाहिजे हे नगरपरिषद विसरुन गेले आहे. दवाखाना जाऊद्याहो पण छत्रपती शिवाजी महाराज पुतळा आहे याची तरी काळजी घ्यायला हवी शिवाय सदरचा रस्ता हा जुना बायपास म्हणुन ओळखला जातो इथुन अहमदनगर टेंभुर्णी रस्त्यावर अनेक वाहनांची वर्दळ असते त्या रस्त्यावरून अनेक बाहेरील नागरिक ये जा करत असतात. बाहेरील लोकांना आपल्या भागातील हे चित्र कसे दिसत असेल त्याशिवाय हा रस्ता त्या ठिकाणावरून जातो त्या ठिकाणी करमाळा बस स्थानक आहे, फंड गल्लीच्या परिसरात त्याही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कचरा टाकलेला दिसून येतो, गाळ असतो. आपण कितीतरी बोंबा मारल्या तरी हे लोक मात्र काय सुधारणार नाही अशी परिस्थिती यातून दिसून येते.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE