तालुक्यातील चार गावात दुष्काळ पाहणी दौऱ्यासाठी केंद्रीय पथक दाखल
करमाळा समाचार
दुष्काळ पाहणी करण्यासाठी केंद्राकडून पथक पाठवण्यात आले आहे. त्यानिमित्ताने आज करमाळा तालुक्यातील घोटी, वरकुटे, नेरले व सालसचे परिसरात सदर पथकाने पाहणी केली. यावेळी दुष्काळाची भयंकर परिस्थितीचे दर्शन त्यांना पाहायला मिळाले.

या दुष्काळ पाहणी पथकात केंद्र शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे अतिरिक्त सल्लागार मुरलीधरण व केंद्र व सार्वजनिक वितरण विभागाचे उपसचिव सरोजनी रावत यांचा समावेश आहे. सदरच्या पथकाने करमाळा तालुक्यातील घोटी, नेरले , वरकुटे व सालसे या ठिकाणी पाहणी केली.

परिसरातील वेगवेगळ्या पिकांचा आढावा घेतला. तर पावसाचे पाणी नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची व चाऱ्याची अडचण सांगितली. सदर पाहणी मध्ये शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकत शेतकऱ्यांच्या बांधावर पथकाने हजेरी लावली. यावेळी त्यांनी पाझर तलाव, विहिरी यांचीही पाहणी केली.
यावेळी प्रांताधिकारी प्रियंका आंबेकर, तहसीलदार शिल्पा ठोकडे, गटविकास अधिकारी श्री देविदास सारंगकर, कृषी अधिकारी संजय वाकडे आदि सह इतर विभागातील प्रमुख अधिकारी उपस्थित होते.