करमाळासोलापूर जिल्हा

आई वडीलांची सेवा करणारा कलयुगातला श्रावणबाळ ; राजकारणी असुन हळव्या मनाचा उपसभापती

करमाळा समाचार 

पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आले गा ! पुराणातील पुंडलिक असो अथवा श्रावणबाळ यांच्या कथा ऐकतच आपण लहानाचे मोठे झालो त्यांनी माता पित्याच्या सेवेसाठी केलेले अपरिमित कष्ट आपल्या सगळ्यांना माहीतच आहेत.

त्यांनी घालून दिलेल्या कार्याचा वसा आपण निरंतर पुढे चालू ठेवणे आपलं कर्तव्य आहे आणि हे एक प्रकारे संस्काराचं देणं असतं. आधी केले मग सांगितले या उक्तीप्रमाणे जे कर्म वडील करतात त्याच अनुकरण मुलं करतात किंवा येणारी पिढी करत असते.अर्थात हे त्या त्यावेळी असणाऱ्या परिस्थितीवर, होऊ घातलेल्या संस्कारावर आणि मनाच्या स्थितीवर अवलंबून असणाऱ्या गोष्टी आहेत.

पण भविष्याचा विचार करताना वर्तमानातले सुखद क्षण हातून निसटले नाहीत पाहिजे म्हणून जे जे शक्य ते ते करण्याची तयारी मनुष्याने ठेवली पाहिजे. माझा रोजचा दिनक्रम याच विचारात होतो की आज आई-वडिलांची सेवा आणखी कशी चांगली करता येईल.

त्यामुळे मागील अनेक वर्षापासून चिखलठाण परिसरात सर्वांचे प्रश्न सोडवण्यासाठी समाजकारणाचा वसा घेतलेले पंचायत समीती उपसभापती दत्तात्रय सरडे घरीही तशी सेवा करताना दिसतात. वडीलांचे आजारपण आणी आईचा गंभीर आजार यात त्यांना इतरांच्या भरवश्यावर न सोडता सगळी सेवा स्वतः सरडे करीत आहेत. उतारवयामुळे आलेला थकवा, आजारपण या गोष्टी नित्याच्याच पण आपला मायेचा उबदार स्पर्श आणि आश्वासक बोलणं उतारवयात सुद्धा माणसाला आधार देतं आणि उरलेलं आयुष्य सुसह्य करण्यास मदतगार ठरतं असे सरडे यांचे म्हणणे आहे.

दिनक्रमाचा भाग म्हणून रोज आईला सकाळी मॉर्निंग वॉकला फिरवून आणणे, तिचे विविध व्यायाम करून घेणे, हातापायांची मालिश करणे, वेगवेगळे औषधी काढे तयार करणे या गोष्टींबरोबरच वडिलांची ही सेवा करण्याचे भाग्य लाभत आहे.

त्यांची सेवा सुश्रुषा करणे, त्यांना अंघोळ घालणे, हवं नको ते पाहणे हे पाहण्यातच माझ्या दिवसाची सुरुवात होते. हे करत असताना कुठेतरी एक मनस्वी समाधान आत सतत जाणवतं की आपल्याला वाढवताना या विठ्ठल-रखुमाई ने काय अपार कष्ट सोसले असतील. याची कल्पना त्यांची सेवा करताना पदोपदी येते तेव्हा त्यांचे पांग काही केल्या फिटणार नाहीत.

परंतु एक कर्तव्यपूर्तीची भावना मनात निश्चित असते की जी प्रत्येकाच्या मनात असायला हवी. त्या पुंडलिकाला प्रत्यक्ष पांडूरंगाने भेट दिली परंतु माझ्यासाठी माझे विठ्ठल-रखुमाई रोजच माझ्यासमोर आहेत आणि त्यांच्या चरणाजवळ माझी सेवा मी समर्पित करत आहे असे सरडे म्हणाले.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE