जर्मन, फ्रेंच, स्पॅनिष भाषा घरबसल्या शिकण्याची सुवर्णसंधी ; गटविकास अधिकारी मनोज राऊत यांचे आवाहन
करमाळा समाचार
इनरव्हील क्लब ऑफ पुणे मिडटाउन या संस्थेच्या वतीने मोफत स्वरूपात परदेशी भाषा शिकण्याचे ज्ञान प्रदान करण्यासाठी ऑनलाइन स्वरूपातील कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या माध्यमातून जर्मन, स्पॅनिश व फ्रेंच या भाषेचे ज्ञान दिले जाणार आहे अशी माहीती गटविकास अधिकारी मनोज राऊत यांनी दिली आहे.

फॉरेन लॅंग्वेज ऑनलाइन एप्लीकेशन ही संस्था इयत्ता पाचवी ते बारावी विद्यार्थ्यांसाठी प्रयत्नशील आहे. परदेशी भाषा परीक्षा देखील सदर संस्था आयोजित करत आहे. सदर संस्थेमार्फत जर्मन, स्पॅनिश व फ्रेंच या परदेशी भाषेचे ज्ञान प्रदान केले जाणार आहे. यासाठी इयत्ता पाचवी ते बारावी मधील कोणत्याही माध्यमात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना नोंदणी करता येईल.

सदरचे प्रशिक्षण पूर्णतः ऑनलाइन स्वरूपातील आहे. याचा कालावधी पाच महिन्यांचा आहे. तरी संबंधित संस्थेने विनंती केल्याप्रमाणे ज्या शाळेतील विद्यालयातील व महाविद्यालयातील इयत्ता पाचवी ते बारावी विद्यार्थ्यांनी सदर ऑनलाइन स्वरूपातील परदेशी भाषा विषयक शिक्षण घेण्याबाबत स्वारस्य आहे अशा विद्यार्थ्यांची यादी पंचायत समिती शिक्षण विभागाकडे आपल्या शाळेच्या लेटर पॅड वर संबंधित विद्यार्थ्यांच्या संपूर्ण शालेय माहितीसह व मोबाईल क्रमांकासह नमूद करून 29 जुलै अखेर सादर करावी अशी माहीती सर्व शाळा, महाविद्यालय व विद्यालयांच्या प्राचार्य, मुख्याध्यापकांना गटविकास अधिकारी मनोज राऊत यांनी दिली आहे.