दुसरीचे शिक्षण घेतलेल्या व्यावसायिकाने शिकवला व्यापाराचा धडा
करमाळा समाचार
कोणताच धंदा छोटा किंवा मोठा नसतो तर मोठ्या गप्पा किंवा निवांत बसण्यापेक्षा कोणताही धंदा करायचा असतो याची शिकवण अवघी दुसरी शाळा शिकलेले विकास यांनी दिले आहे. पोफळज तालुका करमाळा येथील व्यावसायिक विकास सुरवसे यांनी यश कसे खेचून आणायचे असते हे दाखवून दिले आहे. अवघ्या तीन वर्षाच्या कालावधीत मागील वीस लाखांचे कर्ज कमी करण्यात यश आले आहे. आपला व्यवसाय मोठ्या उत्तुंग भरारी कडे नेला आहे. केवळ तीन प्रोडक्ट पासून आज तब्बल २५ वेगवेगळे प्रॉडक्ट तयार करण्यात बालाजी स्नॅक्स या व्यवसायाला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे.

तालुक्यातील सामान्य खेडेगावात एक छोटासा व्यवसाय सुरू केला व त्याच्यात अपार कष्ट करीत आज वेगळ्या उंचीवर नेण्यात विकास सुरवसे यांना यश आले आहे. आपल्या मित्रांसोबत एकदा हॉटेलमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी एक छोट्या पॅकेटमध्ये शेंगदाणे दिसून आले. त्याचा चकणा म्हणून वापर केला जात होता. छोटीशी पॅकेट महाग मिळत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी हा व्यवसाय करण्याचे ठरवले. यावेळी त्यांनी पत्नी माया व मुलगा प्रितम यांना कल्पना दिली व व्यवसायाला सुरुवात केली. आज हे तीघेही मोठ्या जिद्दीने व कष्टाने साथ देत आहेत. विकास यांच्याकडे ना दुकान होते, ना गाडी मग व्यवसायाचे उत्पादन करणे व विक्री कशी करायची हा मोठा प्रश्न होता.

यावेळी त्यांना गावातील नितीन आण्णा शिंदे सहकार्य केले ते आजही त्यांच्या या मित्राचा आवर्जुन उल्लेख करतात. विकास यांनी लोकांकडून उधारीवर कच्चामाल घेतला व त्याच्यातून खारे शेंगदाणे, फुटाणे याची निर्मिती सुरू केली व घरच्या घरी पॅकिंग करून याची विक्री करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला मित्राची गाडी घेऊन करमाळा, माढा, श्रीगोंदा अशा वेगवेगळ्या भागात जाऊन आपले उत्पादन व त्याची चव दाखवण्यास सुरुवात केली. हळूहळू व्यवसायात प्रगती होत गेली केवळ तीन प्रॉडक्ट पासून सुरू झालेला हा व्यवसाय आता २५ प्रकारचे प्रॉडक्ट (बिगर तेलाचे) तयार करत असल्याचे दिसून येत आहे. फुटाण्यांमध्येच सहा प्रकारचे फुटाणे या ठिकाणी विकास सुरवसे बनवतात. विशेष म्हणजे सदरची मालाची विक्री केवळ ऑफलाईन पद्धतीनेच नव्हे तर ऑनलाईन पद्धतीनेही केली जात आहे. यांच्या मालाला करमाळा तालुक्यासह पुणे, सोलापूर, अहमदनगर या भागातूनही मागणी आहे. जवळपास ३०० हॉटेल्स मध्ये याची मागणी असल्याने आज हा व्यवसाय वेगळ्या उंचीवर जाऊन पोहोचला आहे.
पत्नीचे बोट गेल्याने मशीन बदलली…
एके दिवशी काम करत असताना जुन्या मशीन वर पत्नी माया मदत करत होती. यावेळी सदरच्या मशीन मध्ये हात अडकून पत्नीचे बोट निकामी झाले होते. यावेळी मशीन बदलण्याची ठरवली. आता नवीन ऑटोमॅटिक मशीन घेतली असून जुनी मशीनही विक्री केलेली नाही. ज्या मशीन ने धंद्यात उभारी दिली ती मशीन विकणे ही योग्य नाही आणि त्याच्यामुळे पत्नीचे बोट गमवावे लागले त्यामुळे त्याच्यावर काम करणे शक्य नाही. त्यामुळे नव्या मशीनच्या साह्याने सध्या उद्योग सुरू आहे.
सहकार्य करण्याची तयारी …
पूर्वी मित्राची गाडी घेऊन उद्योग करायचो आता मी स्वतःची चार चाकी गाडी घेऊन व्यवसाय करीत आहे. रोज पहाटे चार पर्यंत पॅकिंग करणे व दिवसभर मालाची विक्री व पोहोच करणे असे काम सुरू असते. बाहेर राज्यातून येणारे सामान्य व्यावसायिक न लाजता काम करतात आपल्याकडचाच माल विकत घेऊन विक्री करतात. पण आपले लोक धंद्यात पडत नाहीत सर्वांनी धंदा केला पाहिजे. केवळ मोबाईलवर गेम खेळून पैसे मिळत नसतात तर कष्ट केले पाहिजेत. नवीन उद्योजकांना मदतीची व धंद्यात सुरुवात करण्याची तयारी असेल तर आपण सहकार्य करू.
– विकास सुरवसे,
बालाजी स्नॅक्स, पोफळज.