सरपडोह देवस्थान इनाम जमिनींच्या निर्बंधांवर ३० सप्टेंबरला मंत्रालयात स्वतंत्र बैठक
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दालनात होणार निर्णयासाठी चर्चा; शेतकरी व ग्रामस्थांच्या अडचणींना मिळणार दिलासा?
करमाळा (प्रतिनिधी) :

मौजे सरपडोह, ता. करमाळा येथील देवस्थान इनाम जमिनीवरील निर्बंधांमुळे गेल्या १२ ते १४ वर्षांपासून निर्माण झालेल्या विविध अडचणींबाबत ३० सप्टेंबर २०२६ रोजी मंत्रालयात स्वतंत्र व महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दालनात ही बैठक होणार असल्याची माहिती भाजपा जिल्हा युवा नेते तथा मकाई कारखान्याचे माजी चेअरमन दिग्विजय बागल यांनी दिली.

देवस्थान इनाम जमिनीची नोंद असल्यामुळे सरपडोह येथील जमिनींचे खरेदी-विक्री व्यवहार, वारस नोंदी, घरकुल योजना, पीक कर्ज तसेच विविध शासकीय सुविधांचा लाभ घेण्यात ग्रामस्थांना अडचणी येत असल्याचे बागल यांनी सांगितले.
या प्रश्नाबाबत ग्रामस्थांनी यापूर्वी विविध स्तरांवर निवेदने देऊन मागण्या केल्या आहेत. भाजपा जिल्हा परिषद गटनेत्या तथा भाजपा महिला प्रदेश उपाध्यक्ष रश्मीदीदी बागल यांनी महसूल मंत्र्यांकडे स्वतंत्र पत्राद्वारे हा प्रश्न मांडला होता. त्यानंतर महसूल मंत्र्यांनी या विषयावर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी ३० सप्टेंबर रोजी मंत्रालयात बैठक आयोजित केली आहे.

या बैठकीत सरपडोह येथील जमिनींवरील निर्बंध हटविण्याबाबत ठोस निर्णय होण्याची अपेक्षा दिग्विजय बागल यांनी व्यक्त केली. तसेच सरपडोह येथील ग्रामस्थांचे शिष्टमंडळ बैठकीसाठी मुंबईला नेण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले


