निलज पूरग्रस्तांना आई कमला भवानी संस्थेने केली शेतीसाहित्याची मदत
प्रतिनिधी :

निलज गावातील पूरग्रस्त शेतकरी-कुटुंबियांना शेती उपकरणे व साहित्य देऊन मदत करण्यात आली. कमलाभवानी बहुउद्देशीय सामाजिक संस्था, करमाळा यांनी या हंगामातील पूरग्रस्तांना शेतीसाठी आवश्यक असलेले स्टार्टर, पॅनल बॉक्स, कटाऊट, फिटिंग पट्टी इत्यादी साहित्य वाटप केले.

संस्थेच्या करमाळा येथील कार्यालयात या वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शेतकरी कामगार संघर्ष समितीचे अध्यक्ष दशरथ कांबळे यांनी भूषवले. प्रमुख पाहुणे म्हणून करमाळा पोलिस ठाण्याचे एपीआय टिळेकर, डॉ. रोहन पाटील, अण्णासाहेब सुपणावर, तात्यासाहेब जाधव उपस्थित होते.
सुरवातीला निलज गावकऱ्यांनी सर्व मान्यवरांना पुष्पगुच्छ देऊन गौरविले. संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष यांनी संस्थेची उद्दिष्टे सांगून अशाच प्रकारची सामाजिक कामे पुढेही सातत्याने चालू राहणार असल्याचे आश्वासन दिले. संस्थेचे सचिव अभिजित पाटील, अजिंक्य पाटील व सहसचिव तात्यासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हे कार्य केले गेले.

अध्यक्ष दशरथ कांबळे यांनी म्हटले की, ही संस्था दानशूर व्यक्तिमत्त्व डॉ. प्रदीपकुमार जाधव (आबा) पाटील यांचा वारसा सांभाळत आहे. आबांचे अर्धवट राहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी डॉ. रोहन पाटील यांच्या नेतृत्वाखाली संस्था कार्यरत आहे. या उल्लेखाने सभागृहातील अनेकांचे डोळे आर्द्र झाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश गायकवाड यांनी केले तर आभार प्रदर्शन संतोष वाळूनजकर यांनी केले. अर्बन बँकेचे व्यवस्थापक व संचालक एस.पी. कांबळे तसेच निलज गावातील मोठ्या संख्येने ग्रामस्थ या प्रसंगी हजर होते.

