जिल्ह्यातील ५७१ शाळा ‘ड’ गटात ! शाळांच्या सुविधा तातडीने सुधारण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश
सोलापूर :

जिल्हा परिषदेच्या शाळांमधील भौतिक व शैक्षणिक सुविधांचा विकास करण्यासाठी अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी प्राधान्याने लक्ष द्यावे, अशा सूचना ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिल्या.

शैक्षणिक सुविधा व गुणवत्ता विकास अभियान तसेच सेवा संकल्प अभियानांतर्गत शिक्षण विभागाची जिल्हास्तरीय आढावा बैठक नियोजन भवन सभागृह, सोलापूर येथे झाली. यावेळी ते बोलत होते.
सोलापूर जिल्हा परिषदेच्या २,७६८ शाळांमध्ये सुमारे १ लाख ७४ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. सुविधांच्या आधारे शाळांचे अ, ब, क आणि ड असे वर्गीकरण करण्यात आले आहे. सध्या ५७१ शाळा ड गटात तर १,०८९ शाळा क गटात आहेत. या शाळांमधील अपूर्ण सुविधा तातडीने पूर्ण करून सर्व शाळा अ किंवा किमान ब श्रेणीत आणण्याचे नियोजन असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी दिली.

अधिकाऱ्यांनी शाळांना नियमित प्रत्यक्ष भेटी देऊन शाळानिहाय गरजा आणि आवश्यक निधीचे सूक्ष्म नियोजन करावे. ग्रामसभा घेऊन ग्रामस्थ व पालकांचा सहभाग वाढवावा. तसेच शाळा विकासासाठी शासकीय निधीसोबत CSR, लोकसहभाग आणि माजी विद्यार्थ्यांची मदत घेण्याच्या सूचनाही पालकमंत्री गोरे यांनी दिल्या.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील स्पोकन इंग्लिश गुणवत्ता विकास उपक्रमाचे गटविकास अधिकारी मनोज राऊत यांनी सादरीकरण केले. हा उपक्रम संपूर्ण जिल्ह्यात राबविण्याच्या सूचनाही पालकमंत्र्यांनी दिल्या.
बैठकीस जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, महानगरपालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे, विविध आमदार, जिल्हा परिषद पदाधिकारी, पंचायत समिती सभापती, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्यासह शिक्षण विभागातील अधिकारी उपस्थित होते.


