अवैध वाळू उपसा छाप्यात पळालेल्या आरोपींवर चौकशी नंतर गुन्हा दाखल
करमाळा :

चिखलठाण (ता. करमाळा) येथील उजनी धरण जलाशयाच्या हद्दीत अवैध वाळू उत्खनन सुरू असल्याचा आरोप करत ग्राम महसूल अधिकाऱ्याने करमाळा पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तक्रारदार अमोल बाळासाहेब गायकवाड, ग्राम महसूल अधिकारी, चिखलठाण यांनी तक्रार दिली आहे.

दिलेल्या तक्रारीनुसार, २ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास गोपनीय बातमीदारामार्फत चिखलठाण येथील उजनी धरण जलाशयाच्या जागेत अवैध वाळू उत्खनन सुरू असल्याची माहिती मिळाली.
या माहितीच्या आधारे संबंधित अधिकाऱ्यांनी पाहणी केली असता, चिखलठाण हद्दीतील कोटलिंग मंदिराच्या उत्तरेस उजनी जलाशयालगत काळे तळे परिसरात दोन इसम वाळू उपसा करत असल्याचे निदर्शनास आल्याचे तक्रारीत नमूद आहे. मात्र, पथकाची चाहूल लागताच संबंधित इसम अंधाराचा फायदा घेऊन पळून गेल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.
त्यानंतर करण्यात आलेल्या चौकशीत सदर वाळू उत्खनन हे अविनाश तात्या भोसले (रा. चिखलठाण, ता. करमाळा) आणि अक्षय शिवाजी गुंड (रा. चिखलठाण, ता. करमाळा) यांच्याकडून करण्यात येत असल्याची माहिती मिळाल्याचा दावा तक्रारदाराने केला आहे.
तक्रारीनुसार, अंदाजे २ ब्रास वाळूचे उत्खनन करण्यात आले असून त्याची अंदाजे किंमत ८ हजार रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे. वाळू उत्खननामुळे पर्यावरणाची हानी होत असल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी तहसीलदारांना लेखी अहवाल सादर करण्यात आल्यानंतर तहसील कार्यालयाकडून ८ सप्टेंबर २०२६ रोजी करमाळा पोलिसांना लेखी पत्र देऊन संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.



