यात्रेच्या निमित्ताने गावात आलेल्या तरुणांमध्ये वाद ; एकावर जीवघेणा हल्ला गुन्हा दाखल
करमाळा समाचार
घोटी तालुका करमाळा येथे गावच्या यात्रेच्या निमित्ताने आलेल्या ऋतिक चंद्रकांत चव्हाण रा. येरवडा आळंदी रस्ता, पुणे शहर याच्यावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी घोटी येथील सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरचे प्रकरण दि २ मे रोजी घोटी येथे रात्री एक वाजण्याच्या सुमारास घडले होते. त्यानंतर जखमीला उपचाराला पाठवले त्याच्या तक्रारीनंतर दि १३ ला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आनंद किसन खंडागळे, सुरज किसन खंडागळे, किशोर संजय थोरात, किसन खंडागळे, शुभम खंडागळे सर्व रा. घोटी, ओम चव्हाण (पत्ता माहित नाही) व अनोळखी एक असे एकूण सात जणांवर करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, आनंद व ऋतिक दोघेही कामाच्या निमित्ताने घोटी गावाबाहेर राहतात. गावी यात्रा असल्यामुळे दोघेही आपल्या गावी आले होते. छबीना सुरू असताना मागील भांडणाचा राग मनात धरून दोघांमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर ऋतिकने आपल्या मामाला सर्व हकीकत सांगितली. मामा व ऋतिक दोघे संबंधितांना जाब विचारण्यासाठी गेल्यानंतर सर्वांनी मिळून ऋतिक यास मारहाण करण्यास सुरुवात केली.
यावेळी आनंद खंडागळे यांनी हातातील धारदार शस्त्राने ऋतिकला जबरी जखमी केले. त्यानंतर ऋतिकला दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. सदर प्रकरणाची फिर्याद दिल्यानंतर १३ मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदेश चंदनशिव हे करीत आहेत. आता पर्यत दोघांना ताब्यात घेतले आहे इतरांचा शोध सुरु आहे.