भाजपा प्रवेशानंतर बागलांची नव्याने दुसऱ्या इनिंगची सुरुवात ; गट व कारखाना सावरण्याचे प्रयत्न
करमाळा समाचार
मकाई सहकारी साखर कारखान्यामध्ये आता नव्याने काही बदल करण्यात आले आहेत. त्यामध्ये आठ जणांची स्वीकृत संचालक पदी निवड करण्यात आले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात स्वीकृत संचालक नेमल्यानंतर उलट सुलट चर्चांना उधान आले आहे. परंतु बागल गटाने होऊ घातलेल्या निवडणुका व कारखान्याची स्थिती सुधारण्यासाठी सदरचे पाऊल उचलल्याचे दिसून येत आहे. नुकताच बागल यांनी भाजप प्रवेश करीत कारखान्यातील ऊस उत्पादकांची मागील थकबाकी देण्याचा प्रयत्न केला आहे.

मकाई सहकारी साखर कारखान्याकडे मागील हंगामात जवळपास २६ कोटी रुपयांची थकबाकी असल्याने कारखाना अडचणीत आलेला होता. तर नवे कर्ज मिळण्यास अडचणी निर्माण झाल्या होत्या. या दरम्यान बागल गटाच्या प्रमुख रश्मी बागल यांनी भाजपात प्रवेश केला. त्यावेळी त्यांना महिला प्रदेश उपाध्यक्षपदी काम करण्याची संधी मिळाली. त्याशिवाय तेव्हापासून त्यांचे विविध भागात दौरे ही सुरू आहेत, अशा परिस्थितीत त्यांची सत्ता असलेल्या मकाई सहकारी कारखान्याला कर्ज मंजूर झाले व त्यातून मागील थकबाकी देण्यात त्यांना यश आले. यामुळे सध्या कारखान्यावरील आर्थिक स्वरूपाची अडचण दूर झाली आहे. तर आता लोकांमध्ये जाऊन विश्वास संपादन करण्यासाठी सदरचे पाऊल उचलण्याची गरज असल्याचे दिसून येते. त्यातून बागल यांनी एकाच वेळी आठ ठिकाणी स्वीकृत संचालक निवड केल्यामुळे त्याचा फायदा गटासह कारखान्याला होताना दिसून येईल.

नुतन स्वीकृत संचालक….
ॲड.जयदीप देवकर(वरकटणे), गणेश तळेकर (वांगी), विलास काटे(खातगाव), महेश तळेकर(केम), अशोक पाटील(फिसरे), अनिल शिंदे(कोळगाव), राजेंद्र मोहोळकर (मोरवड), कल्याण सरडे (सांगवी) यांची नुतन स्वीकृत संचालकपदी निवड केली आहे.
नव्या निवडीचा फायदा …
येणाऱ्या हंगामाच्या दृष्टिकोनातून सध्या कारखान्याने तयारी सुरू केली आहे. मागील ऊस उत्पादकांची देणे दिले आहे. तर काही दिवसातच ऊस तोडणी वाहतूकदारांची देणे पूर्ण देण्यात येणार आहेत. तर पुढील हंगामाच्या दृष्टिकोनातून सध्या कारखान्यावर काम करण्यास सुरुवात केली आहे. येणारा हंगाम पूर्ण ताकतीने यशस्वी करण्याचा प्रयत्न राहील. या दृष्टिकोनातून नूतन संचालक निवडले आहेत. एकाच वेळी जरी निवड झाली असली तरी प्रत्येक विभागात वेगळा अनुभव असलेले सदस्य निवडले आहेत. सर्वांच्या अनुभवाचा फायदा कारखान्याची स्थिती सुधारण्यासाठी होईल.
– दिनेश भांडवलकर, अध्यक्ष मकाई सह. कारखाना.