लग्न समारंभात मौल्यवान वस्तु घालुन जाताय तर सावधान ; चाकुचा धाक दाखवत भरदिवसा लुटले
करमाळा समाचार
करमाळ्यातील विवाह आटोपल्यानंतर माघारी आपल्या गावाकडे जात असताना शेतकरी दांपत्याला शिवीगाळ करीत रस्त्यावर अडवण्यात आले. त्या दोघांना अनोळखी तीन व्यक्तींनी चाकू, कोयत्याचा धाक दाखवत गळ्यातील अडीच तोळ्याचा मुद्देमाल त्यात गंठण हिसकावले आहे.

सदरची घटना मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास सावडी ते कुंभारगाव रस्त्यावर घडला आहे. दुपारच्या वेळी घडलेल्या घटनेमुळे पश्चिम भागातील सर्वच गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. किसन राजेंद्र बाबर (वय ४९) रा. हिंगणी यांनी करमाळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी तीन अनोळखी व्यक्तींवर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, किसन बाबर हे पाहुण्याच्या लग्नाच्या निमित्ताने करमाळा येथे कमलाई कारखान्याच्या परिसरात आले होते. दोघे पती-पत्नी हे दुचाकी वर सकाळी अकरा वाजता लग्न स्थळी पोहोचले. तर लग्नकार्य आटोपून ते दुपारी तीनच्या सुमारास करमाळ्यातुन हिंगणीकडे जाण्यासाठी निघाले होते. रस्त्यात जात असताना कोर्टी येथे पाणी पिण्यासाठी थांबले. त्यानंतर ते गावाच्या दिशेने जात होते.

त्यावेळी रस्त्यातच सावडी ते कुंभारगाव या गावांच्या दरम्यान अनोळखी तिघे मोटरसायकलवर आले. त्यांनी पाठीमागूनच शिवीगाळ करीत किसन बाबर यांच्या गाडीला आडवी गाडी उभा केली. गाडी उभा केल्यानंतर त्यांनी हातातील चाकु व कोयत्याचा धाक दाखवून शिवीगाळ सुरू ठेवली. बाबर यांच्या गाडीची चावी काढून दुसरीकडे फेकून दिली. सर्व काही कळण्याअगोदरच त्यातील एकाने बाबर यांच्या पत्नीच्या गळ्यातील गंठण व सोन्याची चैन हिसकावली. यावेळी गंठण तुटून हातात गेले तर सोन्याची चैन तुटून रस्त्यावर पडली. सर्व घेऊन जाता आली नाही. त्यातील काही भाग चोरट्यांना हाताला लागला. तो घेऊन गेले असा एकूण अडीच तोळ्यांचा मुद्देमाल चोरटे घेऊन पसार झाले आहेत.
सदर घटनेनंतर तात्काळ सोशल माध्यमातून घटनेची माहिती सर्व गावातील लोकांना कळल्यानंतर परिसरात लोक सतर्क झाले तर भर दुपारी घडलेली घटना यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सदर घटनेच्या पुढील तपास हा सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कुंजीर हे करीत आहेत.