करमाळा आगाराचा भोंगळा कारभार ; निघतानाच गाडी बंद – धक्का मारुन पाठवली ; पुढे काय ?
करमाळा समाचार –
रोजच वेगवेगळ्या गाड्या बंद पडत असताना कर्मचाऱ्यांना मात्र काहीच न बोलण्याची तंबी दिल्यामुळे कर्मचाऱ्यांना तोंड दाबून बोक्याचा मार सुरू असल्याचेही दिसून येत आहे. नेमकं प्रशासनाला व शासनाला काय सिद्ध करायचं आहे हे कळत नाही. लोकांना एक बाजूने योजना देत आहे तर दुसऱ्या बाजूने बंद पडलेल्या एसटी बस त्यामुळे अनेकांचे हाल होताना दिसत आहेत. यातून बाहेर पडण्याचा दुसरा मार्ग दिसून येत नाही.


ज्या ठिकाणी अधिकारी व राजकीय नेत्यांचा धाक आहे. त्या ठिकाणी मात्र नव्या बसेस दिल्या जातात. सोलापूर जिल्ह्याला आतापर्यंत तसा धाक निर्माण करणारा नेताच मिळाला नसल्याचे दिसून येत आहे. मागील दहा वर्षापासून एकही नवीन बस करमाळा तालुक्याच्या वाट्याला आली नाही. सोलापूर जिल्ह्यात नवीन बस येतही असतील पण त्या बस करमाळ्याच्या वाट्याला येत नाहीत. त्या मागचे कारण नेमकं काय असेल हे न विचारलेलेच बरं.
आज सकाळी करमाळा आगारातील MH 14 4153 ही गाडी सकाळी करमाळा येथून धक्का मारून चालू केली आहे. जवळपास तीनशे किलोमीटरचे हे अंतर जाऊन माघारी येणे आहे. सतत गाडी रस्त्यात बंद पडली तर या गाडीत असलेली लहान मुले, महिला, रुग्ण, विद्यार्थी ज्यांचे अतितातडीचे काम आहे यांनी काय करावे ? असा प्रश्न निर्माण होणार आहे. जर करमाळ्यातच माहीत होते की सदरची गाडी बंद पडत आहे तर तिला पुढे पाठवण्याची काय गरज असा प्रश्न सध्या विचारला जात आहे. एवढा भोंगळा कारभार आज पर्यंत कधीच पाहिला मिळाला नाही.
सदरची गाडी धक्का मारून चालू केल्यानंतर चालकाला गाडी कोठेच रस्त्यात बंद करू नको अशा सूचना दिल्या आहेत अशी माहिती त्या ठिकाणी उपस्थित प्रवाशांकडून देण्यात आली. प्रवाशांना नाईलाज असतो अशा प्रकारच्या गाडीमध्ये जावेच लागते. त्यामुळे रोजच्या रोज एक प्रकारे विषाची परीक्षा पाहिल्यागत हे प्रवासी सदर गाड्यांमधून प्रवास करीत आहेत.