मुख्य कार्यकारी अधिकारी आव्हाळे मॅडम यांनी आढावा बैठकीत दिल्या १९ महत्वाच्या सुचना
करमाळा समाचार
मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीत महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आल्या. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. तर संबंधित विभाग व प्रमुख अधिकारी व्हिडिओ कॉल च्या माध्यमातून सहभागी झाले होते.

मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीत दिलेल्या सूचना..
1. सर्वांनी आपल्या कर्तव्यावर वेळेत हजर राहावे व पूर्ण वेळ उपस्थित राहून कामकाज करावे

2. प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्राच्या देखभाल दुरुस्ती बाबत सर्व माहिती वैद्यकीय अधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी यांनी नियमितपणे अद्यावत करावी तसेच याबाबतचा नियमित आढावा तालुका आरोग्य अधिकारी यांनी घ्यावा.
3. सर्व दुरुस्तीच्या बांधकामाच्या प्रशासकीय मान्यता तालुका आरोग्य अधिकारी व संबंधित अधिकारी यांच्याकडे प्रमा ची प्रत असाव्यात.
4. सर्व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी यांनी संस्थात्मक GAP अनालिसिस करावे व याबाबतचा गोषवारा तालुका आरोग्य अधिकारी यांच्याकडे द्यावा. तालुका आरोग्य अधिकारी यांनी या संदर्भात आढावा घेऊन अंतिम करावा. याबाबतची चेकलिस्ट ग्रुप वर पोस्ट करत आहे.
5. बाह्य रुग्णविभाग- औषध साठा नोंदवही नियमितपणे दैनंदिन अद्यावत कराव्यात.
6. मुदतबाह्य झालेले औषधे यांचा हिशोब ठेवणे त्यांची व्यवस्थित विल्हेवाट लावणे तसेच मुदतबाह्य का झाले याबाबत तालुका आरोग्य अधिकारी यांनी आढावा घेऊन निष्काळजीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यावर कारवाई करावी.
7. सर्व औषध साठा लेबल करून अद्यावत ठेवावा
8. संस्थात्मक प्रसूती – सर्व प्रसूतीगृहाचे अद्यावतीकरण करून घेणे. आवश्यक लागणारे साहित्य प्राप्त करून घेणे सर्व प्रोटोकॉल्स लावून घेणे तसेच प्रसूती मातांना डिलिव्हरी किट देणे याबाबत वैद्यकीय अधिकारी यांनी वैयक्तिक लक्ष द्यावे.
9. EDD/EPD रजिस्टर तसेच अति जोखमीच्या मातांचे रजिस्टर नियमितपणे आठवड्याला अद्यावत करावे यांचा पाठपुरावा ठेवावा व दर आठवड्याला याबाबतचे निष्कर्ष तालुका आरोग्य अधिकारी यांनी पहावे.
10. प्रा आ केंद्र सक्षमीकरणासाठी कायाकल्प कार्यक्रम नियमितपणे राबवावा कार्यक्रमातील अनुषंगिक बाबींप्रमाणे सुधारणा करावी
11. बायोमेडिकल वेस्ट विल्हेवाट नियमितपणे व शास्त्रोक्त पद्धतीने करावी.
12. आपल्याकडील 102 ॲम्बुलन्स ला किती कॉल आले किती मातांना व बालकांना सेवा दिली याचा दर आठवड्याचा गोषवारा तालुका आरोग्य अधिकारी यांनी प्राप्त करून त्याचे विश्लेषण करावे जिथे सेवा मिळत नाही तेथे सुधारणा करावी.
13. प्राथमिक आरोग्य केंद्राकडून संदर्भित केल्या जाणाऱ्या सर्व रुग्णांचे ऑडिट करून घ्यावे
14. प्रोजेक्ट निदान अंतर्गत अशामार्फत प्रत्येक तीस वर्षावरील महिलेचा C BAC फॉर्म भरून घ्यावा. C BAC फॉर्म नुसार लक्षणे आढळणाऱ्या सर्व तीस वर्षांवरील महिलांना स्तनाच्या कर्करोगाच्या तपासणीसाठी यादी अद्यावत करून तपासणी वेळी उपस्थित ठेवावे. 01 एप्रिल ते 30 एप्रिल पर्यंत ही कारवाई पूर्ण करावी.
15. स्तनाच्या कर्करोगाबाबत आशामार्फत गावोगावी त्यांच्या कार्यक्षेत्रात प्रचार व प्रसिद्धी करावी तसेच जिल्हा परिषदेने राबविलेल्या प्रोजेक्ट निदान या उपक्रमाबाबत लाभ घेण्यासाठी विनंती करावी.
16. जे साहित्य प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये वापराविना पडून आहे ते साहित्य जिथे गरज आहे तिथे पाठवून वापरात आणण्याची कार्यवाही एक आठवड्याच्या आत तालुका आरोग्य अधिकारी यांनी करावी.
17. सर्व नवीन मंजूर संस्था बांधकाम पूर्ण झालेल्या असल्यास तेथे पर्याय व्यवस्था देऊन कामकाज सुरू करण्याबाबतचे नियोजन तालुका आरोग्य अधिकारी यांनी अंतिम करून जिल्हा आरोग्य अधिकारी यांचे अवलोकनार्थ पाठवावे व मंजुरी घ्यावी.
18. प्राथमिक आरोग्य केंद्रातील पाईपलाईन आवश्यकतेप्रमाणे तात्काळ दुरुस्त करून घ्यावी व नियमितपणे त्याची निगा राहील गळती राहणार नाही याची दक्षता घ्यावी तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र/ उपकेंद्राचा परिसर आणि शौचालय स्वच्छता नियमितपणे राहील याकडे लक्ष द्यावे.
19. याबाबत कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा अथवा दुर्लक्ष होणार नाही याची दक्षता वैद्यकीय अधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी यांनी घ्यायचे आहे तसेच पुढील सभेमध्ये याबाबतचे प्रेझेंटेशन तालुका आरोग्य अधिकारी यांनी करायचे आहे.
तसेच जिल्हा परिषद अंतर्गत तीन आयुर्वेदिक आरोग्य संस्थांना NABH मान्यता प्रमाणपत्र मिळाले आहे. त्यासाठी अभिनंदन जिल्हास्तरीय अधिकारी यांचे माननीय मुकाअ यांनी केले.