लावंड व ढाणे भांडणानंतर दोन्हीगटाच्या समर्थकांना दिलासा
करमाळा समाचार
करमाळा शहरात मोठ्या प्रमाणावर खडाजंगी होत दोन गटात मारामारी घटना घडली होती. या घटनेत लावंड व ढाणे गट समोरासमोर भिडले होते. यावेळी झालेल्या भांडणानंतर रामभाऊ ढाणे यांच्यासह त्यांचे काही समर्थक जखमी झाले होते. तर लावंड गटाचे दोन जण गंभीर जखमी झाले होते. या प्रकारानंतर पोलीस ठाण्यात दोन्ही गटांच्या विरोधात परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले होते. त्यानंतर करमाळा पोलिसांनी काही जण ताब्यात घेतले. त्यामध्ये लावंड पैकी चार जणांचा समावेश होता. तर ढाणे समर्थकांनी मधील दोन जणांचा समावेश होता. आजही यातील बरेच संशयीत आरोपी फरार आहेत.

भांडणाच्या रात्रीच समर्थकांची शोधाशोध पोलिसांनी सुरू केली. यावेळी लावंड वस्तीवर असलेल्या तालमी जवळ पोलिसांनी काही जणांना अटक केली. त्यामध्ये विजय लावंड, गणेश मोर, प्रमोद लावंड, महेश गायकवाड आदींचा समावेश होता. दुसऱ्या दिवशी दाखल झालेल्या गुन्ह्यांमध्ये ढाणे समर्थकापैकी श्याम ढाणे व सचिन ढाणे यांना अटक करण्यात आली होती.

दोन्ही गटाच्या समर्थकांना न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. त्याची पोलिस कोठडी केल्यानंतर पोलिसांनी तीन दिवसांची कोठडी मागितली होती. परंतु न्यायालयाने ते देण्यास नकार दिला. त्यावेळी त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले. त्याच दरम्यान संशयित आरोपींच्या वकिलांनी जामिनासाठी अर्ज दाखल केले.
यावेळी ढाणे यांच्या बाजूने ॲड. श्री देवकर यांनी काम पाहिले. तर लावंड यांच्या बाजूने ॲड. सुनील घोलप व श्री दिवाण यांनी काम पाहिले. यावेळी दोन्ही बाजूचे युक्तिवादानंतर प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी प्रशांत घोडके यांनी अटी व शर्तींच्या अधीन राहून दोन्ही गटाच्या सहा संशयितांना जामीन मंजूर केला आहे.