करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

पशुधन वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची प्रयत्नाची पराकाष्ठा

संजय साखरे -करमाळा समाचार

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पशुधन वाचवण्यासाठी शेतकरी प्रयत्नांची पराकाष्टा करताना दिसून येत आहे .राजुरी येथील युवा शेतकरी सुहास साखरे यांनी यावर पर्याय शोधला असून ते आपल्या गायांसाठी मुरघास करून ठेवत आहेत .यासाठी त्यांनी पाउन एकर मका चौदाशे रुपये प्रति गुंठा या दराने विकत घेतली असून त्यापासून ते मुरघास तयार करत आहेत. गेल्या तीन महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने दुष्काळाचे भीषण संकट शेतकऱ्यांसमोर उभे आहे. शेतकऱ्यांच्या जीवनाला व प्रपंचाला आर्थिक आधार देणारा व्यवसाय म्हणून दूध व्यवसायाकडे पाहिले जाते .

मात्र पावसाअभावी हा व्यवसाय आता संकटात सापडला असून करमाळा तालुक्याच्या जिराईत भागातील शेतकरी उजनी बॅक वॉटर परिसरातील ऊस गुरांसाठी तोडून चारा म्हणून आणू लागले आहेत.
ज्या शेतकऱ्यांकडे थोडेफार पाणी आहे त्यांनी मका, कडवळ यासारख्या पिकांना प्राधान्य दिले असून त्याचा ते चारा म्हणून उपयोग करत आहेत. याच पार्श्वभूमीवर काही शेतकरी मुरघास करून ठेवण्याचा पर्यायही शोधत आहेत.

काय आहे मुरघास?
मुरघास म्हणजे मुरलेला चारा / घास .हिरवा चारा त्याच्या पौष्टिक अवस्थेत असताना त्यातील अन्न घटकांचा नाश होऊ न देता किमान ४५ दिवस हवा बंद करून वेगवेगळ्या मार्गाने साठवून ठेवणे म्हणजे मुरघास होय. यासाठी काही शेतकरी मोठ्या बॅगचा वापर करतात तर काही जमिनीत खड्डा खोदून त्यामध्ये प्लास्टिक टाकून साठवून ठेवतात व टंचाईच्या काळात त्याचा जनावरांसाठी चारा म्हणून उपयोग करतात.

मी पाऊण एकर मका प्रतिगुंठा १४०० रुपये या दराने खरेदी केली असून यापासून जवळपास १८ टन मुरघास तयार होणार आहे.
सुहास साखरे, दूध उत्पादक शेतकरी, राजुरी

दुष्काळातही माझ्या विहिरीला बऱ्यापैकी पाणी असल्याने मी मका या पिकाची निवड केली असून सर्व मका शेतकऱ्यांना चाऱ्यासाठी विकली आहे. यापासून मला चांगले आर्थिक उत्पन्न मिळाले आहे.
दादा शिंदे,मका उत्पादक शेतकरी, राजुरी

दुष्काळ सदृश्य परिस्थितीमुळे शेतकऱ्यांनी नवीन जनावरे खरेदी करण्याचे थांबवले असून आहे त्या जनावरांनाही चारा कमी पडत असल्याने त्याचा परिणाम दूध संकलनावर झाला आहे. – दत्तात्रय पाटील,सोनई दूध चालक, राजुरी.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE