सोलापूर जिल्हा

आता रेशनवर मकादेखील मिळणार ; सप्टेबर महिण्यापासुन मिळणार लाभ

प्रतिनिधी – सोलापूर

राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गत प्राधान्य कुटुंब आणि अंत्योदय अन्न योजनेतील लाभार्थ्यांसाठी आता रेशनवर मकादेखील मिळणार आहे. सप्टेंबर 2020 या महिन्याचे ग्रामीण भागासाठी गहू, तांदळाबरोबरच मक्याचे नियतन प्राप्त झाले असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी उत्तम पाटील यांनी दिली.

अंत्योदय अन्न योजनेत 57 हजार 272 शिधापत्रिका असून गहू 1146 मेट्रिक टन, मका 286 मेट्रिक टन, तर 573 मेट्रिक टन तांदळाचे नियतन मंजूर झाले आहे. प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांची संख्या 17 लाख 62 हजार 980 एवढी असून गहू 3526 मेट्रिक टन, मका 1763 मेट्रिक टन, तर तांदूळ 3526 मेट्रिक टन धान्य प्राप्त झाल्याची माहिती पाटील यांनी दिली.

या महिन्यात मक्याचे वाटप करण्यात येत आहे. अंत्योदय योजनेत प्रत्येक कुटुंबाला प्रतिमहा 23 किलो गहू 2 रुपयांप्रमाणे, 12 किलो तांदूळ 3 रुपये किलोप्रमाणे, असे 35 किलो धान्य दिले जाते. प्राधान्य कुटुंंब योजनेतील व्यक्तींना प्रतिव्यक्ती 3 किलो गहू, 2 किलो तांदूळ दिले जाते. केशरी कार्डधारकांना प्रतिव्यक्ती 3 किलो गहू प्रतिकिलो 8 रुपये प्रमाणे, 2 किलो तांदूळ 12 रुपये प्रतिकिलो दराने दिले जाते.

नुकतेच सप्टेंबर महिन्याचे नियतन मंजूर झाले असून यामध्ये सोलापूर जिल्ह्याला अंत्योदय योजनेत 286 मेट्रिक टन मका, तर प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांसाठी 1763 मेट्रिक टन मक्याचे नियतन मंजूर झाले आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE