करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

करमाळा शहरातील प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांना ५ ब्रास वाळू देण्याची मागणी

करमाळा :


करमाळा शहरातील प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या घरकुलांच्या लाभार्थ्यांना बांधकामासाठी वाळू उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) यांच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, करमाळा शहरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सुमारे ९० घरकुलांना मंजुरी मिळाली आहे. या घरकुलांचे बांधकाम सुरू करण्यासाठी वाळू मोठ्या प्रमाणावर आवश्यक आहे. मात्र सध्या बाजारात वाळूचे दर खूप वाढले असल्याने गरीब व आर्थिकदृष्ट्या दुर्बल लाभार्थ्यांना घरकुलांचे बांधकाम करणे कठीण होत आहे.

प्रधानमंत्री आवास योजना ही गरीब व वंचित घटकांना सुरक्षित निवारा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने सुरू केलेली महत्त्वाची योजना आहे. त्यामुळे या योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या सर्व लाभार्थ्यांना शासनाच्या धोरणानुसार प्रत्येकी किमान ५ ब्रास वाळू उपलब्ध करून देऊन रॉयल्टी पास देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

तसेच लाभार्थ्यांची यादी पाहून स्थानिक प्रशासनाने तात्काळ वाळूचे पास उपलब्ध करून द्यावेत, अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) यांच्या वतीने लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.

हे निवेदन आरपीआय (आठवले गट) पश्चिम महाराष्ट्र संयोजक नागेश दादा कांबळे यांच्या स्वाक्षरीने देण्यात आले असून याची प्रत करमाळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी तसेच करमाळा पोलिस स्टेशन यांना देण्यात आली आहे.

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE