पाटील गटात उत्साह तर विरोधकांची धडकी भरणारी यात्रा ; तालुक्यात शरद पवारांची राष्ट्रवादी पुन्हा
करमाळा समाचार
राष्ट्रवादीच्या वतीने आज दिग्गजांच्या उपस्थितीत करमाळ्यात शिवस्वराज्य यात्रेचे आगमन झाले. या निमित्ताने तालुक्यातील सर्व राष्ट्रवादी पदाधिकारी आज एकाच व्यासपीठावर पाहायला मिळाले. बऱ्याच दिवसानंतर राष्ट्रवादीमध्ये नवचैतन्य असल्याचे दिसून आले. जणु येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी माजी आमदार नारायण पाटील यांच्या प्रचाराचा नारळच आज फुटल्याचं दिसून येत होते. खा. सुप्रिया सुळे , खा. डॉ. अमोल कोल्हे, मेहबुब शेख यांच्या भाषणांनी पुढे वातावरण कसे राहिले हे दाखऊन दिले. यामुळे पाटील गटात उत्साह तर विरोधकांची धडकी भरणार हे नक्की आहे.

लोकसभा निवडणुका नंतर राष्ट्रवादी पक्षासह महाविकास आघाडीतील मित्र पक्षांमध्ये एक वेगळ्या उत्साहाचं वातावरण बघायला मिळत आहे. खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या माध्यमातून माढा लोकसभा मतदारसंघात मिळालेला विजय ही एक नवी उभारी देणारा ठरला आहे. माढा तसेच सोलापूर येथील लोकसभा विजयामुळे महाविकास आघाडी सध्या तालुक्यासह जिल्ह्यात फॉर्मात आहे. जिल्ह्यात महाविकास आघाडीच्या वेगवेगळ्या पक्षात इनकमिंग वेटींग वर आहे.

काल करमाळ्यात शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्याने मोटारसायकल रॅली काढण्यात आली होती ही रॅली सभा स्थळी पोहचली यावेळी खा. सुप्रिया सुळे, खा. अमोल कोल्हे, खा. धैर्यशील मोहिते पाटील, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख हे सहभागी झाले होते. यावेळी तालुक्यातील सर्व पदाधिकारी उपस्थीत होते. देवीचामाळ येथे अथर्व मंगल कार्यालयात सदरची सभा जवळपास तीन तास उशीरा सुरु झाली. पण तरीही लोक मैदानात वाढतच होते. तब्बल तीन तास उशीराने सदरची रॅली करमाळ्यात सभास्थळी पोहचली त्यावेळी एक नवी उर्जा उपस्थित लोकांमध्ये संचारली.
प्रमुख पाहुणे सुरुवातीला देवीचा दर्शनाला गेले तर सुप्रिया सुळे या तालुकाध्यक्ष संतोष वारे यांच्या मागे मोटारसायकलवर बसुन आल्या मागील सभांपेक्षा यंदाच्या राष्ट्रवादीचा सभेत वेगळे चैतन्य दिसुन आले. याला कारण पण तसेच होते. एकतर मोहिते पाटलांचा विजय आणि माजी आमदार नारायण पाटील यांचा प्रवेश यामुळे संजयमामा शिंदे गट अजितदादा कडे गेल्याने पोकळी भरुन काढणारी होती.
यावेळी सभेत प्रमुख वक्त्यांशिवाय तालुकाध्यक्ष संतोष वारे व बारामती ॲग्रोचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे यांची भाषणे झाली याशिवाय व्यासपीठावर पवारसाहेबांचे निकटवर्तीय आप्पासाहेब झांझुर्णे हे उपस्थित होते. जमलेल्या जनसमुदायाला वारे व गुळवे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी विधानसभेसाठी इच्छुक असलेले वारे हे आबांच्या पाठिशी खंबीरपणे तर आदिनाथ मध्ये झालेल्या वादानंतर सुभाष गुळवे यांनी पक्षाच्या उमेदवाराला निवडून आणण्याचे जाहीर केले.
भाषणा दरम्यान मेहबुब शेख यांनी थेट आ. संजयमामांना छेडले तर यंदा आबांचा विजय निश्चित असल्याचे कोल्हे यांनी सांगितले. यावेळी जास्त वेळ सुरु असलेल्या सभेला बहुसंख्येने जमा झालेले लोक शेवट पर्यत होते. त्यामुळे पक्षाला व आबाला लोकांनी स्विकारले आहे हे दिसुन येत आहे. उपस्थित लोकांचे संपुर्ण सभेदरम्यान आबांवर लक्ष केंद्रीत होते प्रत्येक वक्त्याने फक्त आबांचे कौतुक करुन त्यांना पाठिंबा द्यावे असेच वाटत होते. त्यामुळे तालुक्यातुन मिळणाऱ्या प्रतिसादामुळे पाटील गटातही नवचैतन्य आले आहे.