उजनी जलाशयात सापडला परदेशी बटरफिश
केतूर – अभय माने
करमाळा तालुक्याच्या पश्चिम भागातील उजनी पाणलोट क्षेत्राच्या फुगवट्याच्या पाण्यात मच्छीमारांनी टाकलेल्या जाळ्यामध्ये अंदाजे अर्धा किलो वजनाचा (500 ग्रॅम) आगळावेगळा परदेशी मासा मच्छीमारांना सापडला असून,स्थानिक मच्छिमार या माशाला चंदा या नावाने ओळखतात.तर देशात स्कॅतोफेगस/ बटरफिश/काॅमन स्कॅट/ टायगर स्कॅट या नावाने ओळखले जाते.जलाशयाच्या गोड्या पाण्यात नेहमी सापडणाऱ्या माशापेक्षा हा वेगळ्या प्रकारचा मासा असल्याने या माशांषयी औसुक्य निर्माण झाले आहे.

उजनी फुगवट्यावरिल केत्तूर -पोमलवाडी येथे नव्याने बांधलेल्या पुलाजवळील जलाशयाच्या अथांग पाण्यामध्ये सौरभ कनिचे व रोहन भोई या मच्छीमारांनी टाकलेल्या जाळ्यामध्ये इतर माशाबरोबर हा आगळावेगळा मासा सापडला त्यांनी तो जाळी बाहेर काढला व सकाळचे प्रतिनिधी राजाराम माने यांच्याशी संपर्क साधला व सदर माशाची माहिती दिली.माने यांनी प्राणिशास्त्र व पर्यावरणप्रेमी डॉ.अरविंद कुंभार यांना त्याचे छायाचित्र पाठविल्यानंतर कुंभार यांनी या आगळ्यावेगळ्या माशाविषयी पुढील प्रमाणे माहिती दिली.
-स्थानिक मासेमारी लोकांनी मराठीत चंदा मासा या नावाने ओळखतात.

-बटर फिश, ग्रीन स्कॅट व काॉमन स्कॅट व टायगर स्कॅट हे इतर सामान्य नावे.
– हिरव्या व तांबड्या रंगाचे दोन प्रजाती यात आढळतात.
– या माशाचे मूळ स्थान जपान, न्यू गिनी, दक्षिण आॅष्ट्रेलिया या भागातील चिखलयुक्त सागरी तीरावर व खाडी प्रदेशातील आहे. या भागातील कांदळवनात हे मासे विपुल प्रमाणात आढळतात.
– वर्णन: सामान्यपणे आयताकाराच्या हे माश्यांना बटबटीत डोळे असतात. या माशांचे तोंड गोलाकार असून जबड्यात छोट्या टोकदार दात दोन ओळीत रचलेले असतात. अंगावर काहीशा काटेरहित पर व हिरव्या-तांबूस व सिल्व्हर (रजत) रंगाचा छटा असलेले कातडी असते. कातडीवर गडद तांबड्या- करड्या रंगाचे ठिपके असतात. शरीरावर पाच ते सहा उभे चकाकणारे पट्टे असतात. पोहण्यासाठी पाठीवर व न्यायाच्या अधर बाजूस काटेरी पर असतात. शेपटाकडील पर जपानी पंख्यासारखे आकर्षक असते. हे मासे पोहताना मोहक वाटतात. याच कारणामुळे हे माने जगभरात पाळतात व मत्स्य घरासाठी त्या माशांना मागणी असते.
मच्छीमारांना मिळालेल्या माशांना स्थानिक बाजारपेठेमध्ये भिगवण मच्छी मार्केटपेक्षा जास्त दर मिळत असल्याने मच्छिमार मार्केटला मासे नेणे टाळत आहेत. सदर मच्छिमारांनी हा आगळावेगळा मासा पुन्हा जलाशयाच्या पाण्यात सोडून दिला.यापूर्वीही जलाशयाच्या पाण्यात इंडियन स्टार जातीचे कासव तर मध्यंतरी रेडलाईट जातीचे अमेरिकन कासव सापडले होते तर यापूर्वी कधीही न सापडणारा सकर जातीचा अमेरिकन मासाही सापडला होता.तर केतूर येथे जलाशयात पान मांजरही दिसले होते.
उजनी जलाशयाच्या गोड्या पाण्यामध्ये रहु,कटला,चांभारी, चिलापी, वांभट, शिंगटा, वडशिवडा आदि जातीचे मासे प्रमुख्याने सापडतात परंतु जाळ्यांमध्ये हा आगळावेगळा मासा प्रथमच सापडल्याने उजनीची जैवविविधता वाढत असल्याचे दिसून येत आहे.
उजनी जलाशयाच्या पाण्यात नवीन माशांची भर पडत असताना हे मासे मत्स्यशेती किंवा फिशटॅंक मधून आले असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
” आकर्षक रंगसंगती व लयबद्ध पोहणे या गुणधर्मामुळे हे मासे शोभेसाठी मत्स्य गृहात (फिश अक्वेरियम) पाळतात. खाण्यास उपयुक्त नसलेल्या या माशांना त्याच्या मूळ स्थानातील काही जमातीतील लोक खातात.या माशाला कोणीतरी मत्स्यप्रेमींनी उजनी जलाशयात सोडल्याचा अंदाज नाकारता येत नाही.
– डॉ. अरविंद कुंभार, प्राणिशास्त्र अभ्यासक.
” नेहमीच या ना त्या कारणाने नेहमी चर्चेत राहणाऱ्या उजनी जलाशयाच्या जैवविविधतेत वरचेवर वाढच होत असताना या जैवविविधतेचे संवर्धन होणे काळाची गरज आहे. त्यासाठी प्रशासनाने आवश्यक ते प्रयत्न करणे गरजेचे झाले आहे.
. -कल्याणराव साळुंके,पक्षीप्रेमी. कुंभेज (ता.करमाळा)