शेतकऱ्यांनी काळजी करू नये; संपूर्ण उसाचे गळीत झाल्यावरच कारखान्याचा ऊस गळीत हंगाम बंद केला जाईल – बागल
करमाळा समाचार
मकाई सहकारी साखर कारखाना आपल्या कार्यक्षेत्रातील संपूर्ण उस गाळप झाल्यावरच गळीत हंगाम बंद करण्याचे निश्चित केले जाईल. उसाचे एक टिपरू गळपाशिवाय राहणार नाही. याबाबत शेतकरी सभासदांनी काळजी करू नये व निश्चित रहावे असे मकाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन दिग्विजय (भैय्या) बागल यावेळी म्हणाले.

याबाबत पुढे सविस्तर बोलताना बागल म्हणाले की, मकाई कारखान्यामार्फत कार्यक्षेत्रातील संपूर्ण क्षेत्रातील उसाचे गाळप झाल्यावरच पुढील निर्णय घेण्यात येईल. सभासद शेतकऱ्यांनी कोणतीही काळजी अथवा चिंता करू नये. संपूर्ण उसाचे गाळप ही कारखान्याची जबाबदारी असून त्याप्रमाणे शेती विभागाने योग्य नियोजन केले आहे. संपूर्ण ऊस गळीत केल्याशिवाय कारखान्याचा ऊस गळीत हंगाम बंद केला जाणार नाही.

तोडणीबाबत सभासद शेतकऱ्यांकडून ऊसतोडणी करणाऱ्या टोळ्या अव्वाच्या सव्वा पैसे घेऊन अडवणूक करत आहेत, याबाबत शेती विभागाला योग्य ती कारवाई करण्याच्या सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. शेतकरी सभासदांच्या उसाला प्राधान्याने न्याय देण्याची भूमिका आमची कायमच राहिली आहे. शेतकरी सभासदांनीही गावपातळीवर गावटोळी करून उसवाहतुक करावी. सुगीचे दिवस लक्षात घेता ऊसतोड करण्यासाठी हार्वेस्टर मशीनचाही प्रसंगी वापर केला जाईल. परंतु कसल्याही स्थितीत कोणाचाही ऊस राहणार नाही याची पूर्ण काळजी कारखान्याने घेतली आहे. याबाबत सभासद शेतकऱ्यांनी निश्चित राहावे.
आजपर्यंत सभासद शेतकऱ्यांनी जो विश्वास मकाईवर दाखवला आहे तोच विश्वास यापुढील काळातही ठेवावा. आजअखेर कारखान्याने 1 लाख 97 हजार 500 मेट्रिक टन उसाचे गळीत केले असून कारखाना आपल्या सर्वांच्या सहकार्याने यावर्षीचा हंगाम निश्चितपणे यशस्वी होईल यात कोणतीही शंका नाही असे त्यांनी यावेळी सांगितले.