सोलापूरच्या व्यापाऱ्याकडुन करमाळा तालुक्यातील शेतकऱ्याची आर्थीक फसवणुक ; कारवाईची मागणी
करमाळा – संजय साखरे

राजाने छळले ,पावसाने झोडपले, आणि नवऱ्याने मारले तर तक्रार कोणाकडे करायची? अशीच काहीशी अवस्था आता शेतकऱ्यांची झाली आहे . कोरोना सारख्या महाभयंकर संकटाने शेतकरी पुरता खचून गेलेला असताना शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालाचे पैसे देण्यास व्यापाऱ्यांनी टाळाटाळ चालवली आहे.

असा प्रकार राजुरी तालुका करमाळा येथील शेतकरी श्री बिभीषण माणिक साखरे यांच्या बाबतीत घडला आहे. त्यांनी दिनांक ५ मार्च २०२१ रोजी आपला ६० गोणी कांदा सोलापूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतील आडतदार श्री गुरुनाथ इररणा उपासे यांच्या आडती वर विक्रीसाठी नेला. सदर कांद्यास २३ रुपये५० पैसे इतका दर मिळाला व त्याची पट्टी ७१हजार रुपयांच्या आसपास झाली. त्यापैकी अकरा हजार रुपये रोख देऊन आडत दुकानदार उपासे यांनी शेतकरी श्री साखरे यांना ६०१६० रुपयाचा दि.१४/३/२०२१ या तारखेचा महेश अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, सोलापूर या बँकेचा चेक दिला.

सदर शेतकर्याने तो चेक त्यांच्या बँक ऑफ इंडियाच्या कोर्टी येथील शाखेत भरला असता संबंधित खातेदाराच्या खात्यावर पैसे नसल्यामुळे तो परत आला आहे. बँकेने यासंदर्भात त्यांना रिटर्न मेमो दिला. यादरम्यान शेतकरी श्री बिभीषण साखरे यांनी संबंधित व्यापाऱ्याला फोन लावला असता त्यांनी फोन उचलला नाही. कोरोनामुळे लॉक डाउन असल्याकारणाने त्यांना सोलापूरला ही जाता आले नाही. दरम्यान तीन महिन्यापूर्वी विकलेल्या कांद्याचे पैसे अद्यापही न मिळाल्याने शेतकरी मात्र हवालदिल झाला आहे.
मी मार्चच्या पहिल्या आठवड्यात सोलापूर येथील आडत दुकानदार गुरुनाथ उपासे यांच्या आडती वर कांदा विक्रीसाठी नेला होता. परंतु तीन महिने झाले तरी अद्याप त्यांनी दिलेल्या चेकचे पैसे मिळाले नाहीत. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीने व प्रशासनाने या व्यापार यावर योग्य ती कारवाई करून माझे पैसे मला मिळवून द्यावेत.
श्री बिभीषण माणिक साखरे, कांदा उत्पादक शेतकरी, राजुरी, ता. करमाळा