बारामती ॲग्रो साखर कारखान्याचा पहिला हप्ता जमा
प्रतिनिधी – संजय साखरे
तालुक्याच्या पश्चिम भागातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी संजीवनी असलेल्या बारामती ऍग्रो लिमिटेड शेटफळगडे तालुका इंदापूर जिल्हा पुणे या साखर कारखान्याच्या चालू गाळप हंगामाचा पहिला हप्ता प्रतिटन 2300 रुपये प्रमाणे जमा झाल्याची माहिती कारखान्याच्या वतीने देण्यात आली आहे.

पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात असलेल्या साखर कारखान्याला करमाळा तालुक्याच्या पश्चिम भागातुन मोठ्या प्रमाणावर उसाचा पुरवठा होतो. दरवर्षीप्रमाणेच याहीवर्षी कारखान्याने प्रथम हप्त्याच्या उच्च दर्जाची परंपरा कायम राखली आहे. वेळेवर ऊस बिले देण्याबरोबरच शेतकऱ्यांना रासायनिक खते व ठिबक सिंचनाचा पुरवठा या कारखान्यामार्फत केला जातो. त्यामुळे शेतकऱ्यांचा ओढा या कारखान्याला ऊस घालण्यासाठी असतो.

यावर्षी कारखान्याचे विस्तारीकरण झाले असून तो सरासरी प्रति दिन 11 हजार मेट्रिक टन उसाचे गाळप करत आहे. बारामती ॲग्रो साखर कारखान्याने जाहीर केलेल्या प्रथम हप्त्याच्या ऊसदराचे ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून स्वागत करण्यात येत आहे.