करमाळासोलापूर जिल्हा

ॲप डाऊनलोड करून आपले संबंधी पीक पाहणी अद्ययावत करावी – तहसीलदार माने

करमाळा समाचार 

राज्य शासनाने पीक पेरणी बाबतची माहिती गाव नमुना नंबर 12 मध्ये नोंदविण्यासाठी शेतकऱ्यांनी स्वत: भ्रमणध्वनीवरील ‘ई पीक पाहणी’ ॲपद्वारा उपलब्ध करून देण्यात आली आहे.‘ई-पीक पाहणी’ कार्यक्रम टाटा ट्रस्टने विकसित केलेल्या आज्ञावलीचा वापर करून 15 ऑगस्ट 2021 पासून राबविण्याचा निर्णय घेतला आहे. करमाळा तालूक्यातील शेतकरी यांनी ‘ई-पीक पाहणी’ हे ॲप डाऊनलोड करून आपले संबंधी पीक पाहणी अद्ययावत करावी असे आवाहन तहसीलदार समीर माने यांनी केले आहे.

पीक पेरणी अहवालाची वस्तुनिष्ठ माहिती संकलित होण्याच्यादृष्टीने आणि पीक विमा व पीक पाहणी दावे,आपत्कालीन मदत यासंबंधी डाटा उपलब्ध होणेकामी आज्ञावली विकसित करण्यात आली आहे. या प्रणालीत प्रत्यक्ष शेतकऱ्यांचा सहभाग असल्याने पारदर्शकता आणणे शक्य झाले आहे.असेही तहसीलदार समीर माने यांनी सांगितले.

या आज्ञावलीचा उपयोग करून करमाळा तालुक्यातील 118 महसूली गावामध्ये ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
ई-पीक पाहणीद्वारे माहिती तंत्रज्ञानाचा वापर करुन पीक पाहणीची जलद, वस्तूनिष्ठ आणि पारदर्शक पध्दतीने माहिती संकलित करण्यात येणार आहे.

ॲपच्या माध्यमातून अधिप्रमाणित रिअल टाइम डेटा उपलब्ध होणार आहे. मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे स्वत:च्या शेतातील उभ्या पिकांची माहिती, अक्षांश-रेखांश दर्शविणाऱ्या पिकांच्या छायाचित्रासह उपलब्ध होऊ शकणार आहे.
शेतकऱ्यांना देय असणाऱ्या कोणत्याही योजनेच्या थेट लाभासाठी ई-पीक पाहणी प्रकल्पातील माहिती अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

गाव, तालुका, जिल्हा आणि विभाग निहाय पिकाखालील क्षेत्राची अचूक आकडेवारी सहज उपलब्ध होणार आहे.
ठिबक आणि तुषार सिंचन योजनेसारख्या योजनांचा लाभ खातेधारकांना अचूकरित्या देणे शक्य होणार आहे.
खातेदारनिहाय पीक पाहणीमुळे खातेदार निहाय पीक कर्ज देणे, पीक विमा भरणे किंवा पीक नुकसान भारपाई शक्य होणार आहे.कृषि गणना अत्यंत सुलभ पद्धतीने व अचूकरित्या करता येईल.

ई-पीक पाहणी अंतर्गत खातेदाराची एकदाच नोंदणी करण्यात येईल.15 सप्टेंबरपर्यंत हंगाम निहाय पिकाची माहिती अक्षांश-रेखांशासह काढलेल्या पिकाच्या छायाचित्रासह अपलोड करण्यात येईल.
16 ते 30 सप्टेंबर दरम्यान मोबाईल ॲपमधील माहितीची अचूकता पडताळून आणि आवश्यक असल्यास दुरूस्ती करून तलाठी ती कायम करतील.
खातेनिहाय पिकांची माहिती संबंधित डिजिटल स्वाक्षरीत 7/12 मधील गाव नमुना नंबर 12 मध्ये उपलब्ध करून देण्यात येईल.

1 ऑक्टोबरपासून शेतकरी रब्बी हंगामाची पीक पाहणी अपलोड करू शकतात. एका मोबाईलवरून 20 खातेदारांची नोंदणी करता येणार असल्याने एखाद्या शेतकऱ्याकडे स्वत:चा स्मार्टफोन नसल्यास उपलब्ध होणारा दुसरा र्स्माटफोन वापरता येईल. अल्पवयीन खातेदाराच्या बाबतीत त्याचे पालक नोंदणी करू शकतात. सामायिक खातेदार त्यांच्या वहीवाटीत असलेल्या क्षेत्रातील पिकांची स्वतंत्रपणे नोंदणी करू शकतील. शेतकऱ्यांना विविध सुविधा आणि योजनांचा लाभ घेणे शक्य होणार असल्याने आणि ही प्रक्रीया पारदर्शक असल्याने प्रत्येक शेतकऱ्यांनी आपली पिकांच्या नोंदी तात्काळ कराव्यात.

त्यादृष्टीने आवश्यक प्रशिक्षणाला सुरूवात करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी या प्रणालीची माहिती घेतल्यास येत्या काळात त्याला ई-पीक पाहणी उपयुक्त ठरू शकेल.

पीक पेरणीची माहिती भ्रमणध्वनी वरील ॲप द्वारा (Mobile App) गा.न.नं. 12 मध्ये नोंदविण्यासाठी स्वत: शेतकऱ्यांनी उपलब्ध करुन देण्याचा ई-पीक पाहणी कार्यक्रम संपूर्ण करमाळा तालूक्यात राबविण्यात येत आहे.सर्व शेतकरी यांनी आपली पीक पाहणी अद्ययावत करावी.याकामी आपणास आवश्यक तांत्रिक मदत आपलेसंबंधी तलाठी,ग्रामसेवक व कृषीसहायक करतील तसे आदेश त्यांना दिले आहेत.
समीर माने
तहसीलदार करमाळा

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE